भाजप आणि ओवैसी म्हणजे राम आणि श्यामची जोडी, संजय राऊतांचा हल्लाबोल

भाजप आणि ओवैसी म्हणजे राम आणि श्यामची जोडी, संजय राऊतांचा हल्लाबोल

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Kasba Peth Bypoll Election 2023, Chinchwad Bypoll Election 2023) आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान, या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच त्यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (AIMIM Asaduddin Owaisi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हिंदूत्ववादी सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावे

खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली. सावरकारांबाबत वाद असण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात आणि केंद्रात सावरकरांच्या विचाराचं सरकार आहे. पण सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी केली तर भाजपच्या तोंडाला फेस येतो, असा टोला संजय राऊत लगावला आहे. आज सावरकरांचा स्मृतीदिन आहे.  सावरकर या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतीकारक होते. महाराष्ट्राचे सुपूत्र आणि महान नेते होते. त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. ते हिंदूहृदयसम्राट होते. त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची प्रेरणा घेतली. त्यामुळे केंद्र सरकारकडून वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

भाजप आणि ओवैसी राम-श्यामची जोडी 

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भाजप आणि ओवैसी म्हणजे राम आणि श्यामची जोडी असल्यासारखे आहे.  एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. जिथे जिथे निवडणूक असते आणि भाजपला त्यांची गरज भासते तिथे ओवैसी हजर होतात. त्यामुळे भाजप आणि ओवैसी हीच खरी राम आणि श्यामची जोडी शोभते, असं म्हणत राऊतांनी ओवैसी यांच्यावर टीका केली.

 

नवी मुंबईत एमआयएमचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. यानिमित्ताने एमआयएमचे नेते सध्या मुंबईत आहेत. याच कार्यक्रमात ओवैसींनी शिंदे आणि ठाकरे हे राम-श्यामची जोडी असल्याचा आरोप केला होता. त्याला खासदार राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.


हेही वाचा : मुंबईतील विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारकडून गती, सुशोभीकरणांतर्गत 320 कामांचं भूमिपूजन


 

First Published on: February 26, 2023 12:04 PM
Exit mobile version