पंतप्रधान मोदींची पदवी ऐतिहासिक…, नव्या संसदेच्या गेटवर लावा; संजय राऊतांची टीका

पंतप्रधान मोदींची पदवी ऐतिहासिक…, नव्या संसदेच्या गेटवर लावा; संजय राऊतांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून सुरू झालेला वाद काही थांबताना दिसत नाही. विरोधकांनी मोदींच्या डिग्रीचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. तर भाजपची या मुद्द्यावरून चांगलीच कोंडी झाली आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी असून, ती संसदेच्या गेटवर लावावी’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे. (MP Sanjay Raut Slams Pm Narendra Modi Over Degree)

खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या पदवीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे. “आपल्या पंतप्रधान मोदीजींची ही पदवी बोगस आहे असे लोक म्हणतात, पण ‘संपूर्ण राज्यशास्त्र’ या संशोधन विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी आहे असे माझे मत आहे. ती फ्रेम करून नवीन संसदेच्या मुख्य गेटवर टांगली पाहिजे. जनतेने पंतप्रधानांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.

सामनातूनही पंतप्रधान मोदींच्या पदवीवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. आता या वादात ठाकरे गटाने उडी घेतली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सवाल करण्यात आला आहे. मोदींना तुमची इयत्ता कंची असं विचारल्यावर हा बदनामीचा कट आहे असं म्हटलं जातं. मुळात पदवी विचारल्यावर यात लपवण्यासारखे काय आहे? असा सवाल दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे. तसेच मोदींची डिग्रीच रहस्यमय असून एन्टायर पॉलिटिकल सायन्स हा कधीच न ऐकलेला विषय घेऊन त्यांनी एमए केले आहे. त्यामुळे ते अनपढ आहेत असं कसं म्हणावे? असा खोचक सवाल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.


हेही वाचा – राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

First Published on: April 3, 2023 8:10 AM
Exit mobile version