दिवाळीत एसटी महामंडळ ‘तुपाशी’, पण कर्मचारी अद्याप ‘उपाशी’

दिवाळीत एसटी महामंडळ ‘तुपाशी’, पण कर्मचारी अद्याप ‘उपाशी’

यंदा दिवाळीनिमित्त एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आर्थिक दिलासा मिळाला. मात्र उत्पन्नात वाढ झाली असतानाही अद्याप एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सध्या एसटी महामंडळ ‘तुपाशी’, पण कर्मचारी अद्याप ‘उपाशी’ अशी परिस्थित निर्माण झाली आहे. (msrtc staff not even getting salary on time maharashtra)

एसटी महामंडळाचे कोरोना काळातील दोन वर्ष अतिशय खडतर गेले आहेत. कोविड काळामध्ये एसटी महामंडळाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर अनेक महिने सुरू असलेला एसटीचा संपाचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला होता. त्यातच सातत्याने तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांना नियमित पगार देणे कठीण झाले आहे. तसेच, विविध भत्तेही वेळेवर दिले जात नाही. यंदाच्या दिवाळीत एसटी महामंडळाच्या उत्पन्नात 11 दिवसांत तब्बल 275 कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे या उत्पन्नातून थकीत रक्कम मिळावी, अशी अपेक्षा कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

एसटी मंहामडळाला मिळालेल्या उत्पन्नातून डिझेलचा आणि इतर खर्च काही प्रमाणात भागविला जातो. मात्र, वेतनासाठी सरकारपुढे हात पसरावे लागतात. एसटी महामंडळाला स्वत:ला वेतन खर्च भागवता येईल, इतके उत्पन्न येत नाही. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलत योजनांची रक्कम शासनाकडून वेळेवर मिळत नाही. कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत 2 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम महामंडळाला मिळाली. यातून कर्मचाऱ्यांचे पगार होत गेले, पण थकबाकीसाठी ताटकळतच ठेवले जात आहे.

दरम्यान, तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारा व्यतिरिक्त बसेसचे मेंटेनन्स योग्यरीत्या करता येत नाही. परिणामी महामंडळाच्या बसेसना आगी लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ऐन दिवाळीत एसटीला आग लागण्याच्या तीन घटना घडल्या होत्या. तसेच, महामंडळाच्या सेवेत असलेल्या खासगी शिवशाही बसेसच्या मेंटेनन्सची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांकडे आहे. वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानेही बस पेटते. याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाबही पुढे आली आहे.

याशिवाय, महागाई भत्तावाढीची फाइल सरकारकडे तीन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आली. त्यावर अजून तरी निर्णय झालेला नाही. ही फाइल मंजूर झाल्यास दिवाळीत मिळालेल्या वाढीव उत्पन्नातून थकीत रक्कम मिळण्याची आशा कर्मचाऱ्यांना आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना एखादा दुर्धर आजार बळावल्यास कर्ज काढून बिल चुकते करावे लागते. दरम्यान, प्रवाशांना स्वस्त दरात आणि सोयीची वाहतूक सेवा देणाऱ्या एसटी महामंडळामध्ये सध्या जवळपास 90 हजार कर्मचारी काम करत आहेत. या 90 हजार कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 38 हजार चालक, 34 हजार वाहक आणि 16 हजार यांत्रिक आहेत.


हेही वाचा – ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव, ‘सामना’तून भाजपा आणि शिंदे गटावर शरसंधान

First Published on: November 7, 2022 8:42 AM
Exit mobile version