घरमहाराष्ट्र'नोटा'च्या बुरख्याआड रडीचा डाव, 'सामना'तून भाजपा आणि शिंदे गटावर शरसंधान

‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव, ‘सामना’तून भाजपा आणि शिंदे गटावर शरसंधान

Subscribe

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून ऐक्य राखले. शिवसैनिकांबरोबर दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते मनापासून कामास लागले. मुस्लिम समाज असेल नाहीतर ख्रिस्ती बांधव, सगळेच मतदानास उतरले. मराठी जनांची एकजूट तर अभेद्यच राहिली. दुसरीकडे भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही. ‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही ‘नोटा’चा प्रचार केला गेला. लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली. त्यामुळे खोके सरकार आपल्या नामकरणास पुरेपूर जागले. निवडणूक ग्रामपंचायतीची असो नाही तर विधानसभेची, खोक्यांशी नाते कायम ठेवायचे असे या मंडळींनी ठरवले आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतही तेच झाले. येथे ‘नोटा’साठी नोटा वापरल्या गेल्या. अर्थात, एवढे सगळे उपद्व्याप करूनही जनता ना ‘नोटां’ना भुलली ना ‘नोटा’च्या भुलभुलैयाला! ‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजप व मिंधे गटाची मळमळ होती. मतदारांनी मात्र ऋतुजा लटके यांच्या पारडय़ात भरभरून मतदान केले आणि भाजप-मिंध्यांचे कारस्थान उधळून लावले, असा जोरदार हल्लाबोल ‘सामना’तील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.

- Advertisement -

बेअब्रू होऊ नये म्हणून माघार
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जसा लागायचा तसाच लागला. भडकत्या मशालीवर विरोधकांनी गुळण्या टाकून विझविण्याचा प्रयत्न केला, पण मर्दांच्या हातातील मशालच ती. विझली नाहीच. उलट शिवसेनेचे तेज अधिक प्रकाशमान केले. पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपबरोबर सरकार स्थापन करून त्यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेतले. म्हणजे भाजपने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला. धनुष्यबाण गोठवून भाजप व त्यांच्या मिंध्यांना विकृत आनंद मिळाला तरी मुंबईची जनता मात्र शिवसेनेच्या पाठीत झालेले घाव पाहून खवळून उठली. हाती मशाल हे चिन्ह घेऊन नव्या लढ्यासाठी सज्ज झाली. जनता जनार्दनाचा हा संताप पाहून भाजप मिंधे गटाचे उमेदवार कोणी मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, माणुसकी अशा शब्दांच्या टिचक्या मारून भाजपने माघार घेतली होती ती फक्त मुंबईत पहिल्याच निवडणुकीत बेअब्रू होऊ नये म्हणून, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

…तर फैसला झाला असता
मुळात अंधेरी पोटनिवडणूक आपणास लढायची आहे, असा वाद निर्माण करून भाजपपुरस्कृत मिंधे गटाने धनुष्यबाणावर दावा लावला व निवडणूक आयोगाने परंपरा, इतिहास, खरे-खोटेपणाचे भान न ठेवता शिवसेना हे नाव व धनुष्यबाणच गोठवले. ही गोठवागोठवी करून भाजप व त्यांच्या मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. आमची मनापासून इच्छा होती, भाजप व त्यांच्या मिंधे गटाचे उमेदवार या निवडणुकीत उतरायलाच हवे होते. म्हणजे मुंबईत आवाज आणि गर्जना कोणाची याचा फैसला लागला असता, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यात दिवाळी
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर शिवसेना खचेल, हतबल होईल असे ज्यांना वाटत होते त्यांचे डोळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील ‘मशाली’च्या विजयी भडक्याने दिपले आहेत. ‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. तथापि, राज्याची जनता मात्र आज पुन्हा दिवाळी साजरी करीत आहे. दुष्मनांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी शिवरायांनी मशालीचाच वापर केला होता. तो इतिहास जरा आमच्या विरोधकांनी समजून घेतला पाहिजे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुनावले आहे.

मतदारांचे आभार
‘मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. तथापि, राज्याची जनता मात्र आज पुन्हा दिवाळी साजरी करीत आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या रणात उतरून ज्या शिवसैनिकांनी, मतदारांनी शिवसेनेस विजय मिळवून दिला त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत. आम्ही त्या शिवसेनाप्रेमींना साष्टांग दंडवत घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान राखल्याबद्दल लाख लाख धन्यवाद देत आहोत. विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील! विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील!! राजकीय चिता पेटवत राहील, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -