Mumbai Corona Update : मुंबईत नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मृतांच्या संख्येत वाढ

Mumbai Corona Update : मुंबईत नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मृतांच्या संख्येत वाढ

मुंबईत मागील दोन दिवस पाच हजार कोरोनाबाधितांची नोंद होत होती परंतु शनिवारी मुंबईत ३ हजार ५६८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी नव्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाला असल्याचे दिसते आहे. गेल्या २४ तासात २३१ रुग्णांना कोरोनावर मात केली असल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी मृतांची संख्या मात्र वाढली आहे. गेल्या अनेक दिवसानंतर मुंबईत कोरोनामुळे शनिवारी १० रुग्णांचा मृत्यू झाला आणि आतापर्यंत एकूण १६ हजार ५२२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात ३ हजार ५६८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये २ हजार ९९८ रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. ८४ टक्क्यांना कोरोनाची लक्षणे नसल्याचे आढळल्याची दिलासादायक बाब आहे. नव्या रुग्णांपैकी केवळ ४८५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मुंबईत ४ हजार २९३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी १ हजार ९०५ रुग्ण ऑक्सीजन बेडवर आहेत तर गेल्या २४ तासात ७६ रुग्णांना ऑक्सीजन बेडची गरज भासली आहे.

मुंबईत आतापर्यंत १ करोड ३२ हजार २८३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातून ९९ लाख५ हजार ५६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत शनिवारी ४९ हजार ८९५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ टक्क्यांवर गेला आहे. रुग्ण दुप्पटीचा दर १०५ वर गेला आहे.

राज्यात ४६ हजार ३९३ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ उतार कायम राहिला आहे. शनिवारी राज्यात एकूण ४६ हजार ३९३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. एकाच दिवसात १ हजार २२५ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर २४ तासात मुंबईत ३२१ आणि नागपूरमध्ये ६२ ओमिक्रॉनबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ७५९ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. ३० हजार ७९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या २ लाख ७९ हजार ९३० कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.


हेही वाचा : Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

First Published on: January 22, 2022 10:04 PM
Exit mobile version