चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर चिंचपोकळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकाला मारहाण

चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर चिंचपोकळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकाला मारहाण

चिंतामणीच्या प्रवेशद्वारावर चिंचपोकळी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गणेशभक्त लालबाग परिसरात गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. परंतु भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण करत असताना कार्यकर्त्यांकडून गणेशभक्तांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

भाविकांची गर्दी नियंत्रणात करत असताना बॅरिकेट्स लावण्यात येत होते, त्यावेळी काही भाविक आतमध्ये शिरले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकाला मारहाण केल्याची घटना घडली. चिंतामणी गणेशाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या बॅरिकेट्सला ढकलून शेकडो भाविकांचा लोंढा आत येत होता. त्यांच्यावर नियंत्रण करण्याचं काम सुरू असताना कार्यकर्त्यांचा संमय सुटला आणि त्यांनी भाविकांना मारहाण करायला सुरुवात केली.

या व्हायरल व्हिडीओवर मंडळाचे सचिव प्रणील पांचाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गणेश दर्शनासाठी गर्दी झाली असताना ही संपूर्ण गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. कार्यकर्त्यांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मारहाण झालेला एक मुलगा नशा करून आला होता. त्यानंतर त्याने महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळाली, त्यामुळे हा प्रकार घडला. आम्ही पोलिसांकडे अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केली आहे, असं प्रणील पांचाळ म्हणाले.

काही दिवसांपूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या एका महिला भाविकाची सुरक्षा रक्षकासोबत बाचाबाची झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी वारंवार समोर येत आहे. या कारणांमुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांची अरेरावी कुठेतरी थांबली गेली पाहीजे, अशा प्रतिक्रिया भाविकांमधून उमटत आहेत.


हेही वाचा : सुप्रिया सुळेंना दुसरं कोणी मोठं झालेलं बघवत नाही, गोपीचंद पडळकरांचा टोला


 

First Published on: September 4, 2022 6:07 PM
Exit mobile version