उद्याने, मैदाने व क्रीडांगण पालिका दत्तक तत्वावर देणार, अतिक्रमण रोखण्यासाठी लवकरच नवीन धोरण

उद्याने, मैदाने व क्रीडांगण पालिका दत्तक तत्वावर देणार, अतिक्रमण रोखण्यासाठी लवकरच नवीन धोरण

उद्याने, मैदाने व क्रीडांगण पालिका दत्तक तत्वावर देणार, अतिक्रमण रोखण्यासाठी लवकरच नवीन धोरण

मुंबई महापालिका, मनोरंजन मैदाने, उद्याने, क्रिडांगणे व मोकळे भूखंड यांचे अतिक्रमणापासून संरक्षण होण्यासाठी व त्यांचे परिक्षण करण्यासाठी इच्छुक बड्या संस्थांना दत्तक तत्वावर देण्यासाठी आवश्यक नवीन धोरण तयार करीत आहे. याबाबतची माहिती, पालिका उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी, पालिकेकडे सध्या किती उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, किती मोकळे भूखंड आहेत, त्यावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी व भूखंडांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेचे काही धोरण आहे का, ते भूखंड दत्तक देण्याचे धोरण पुन्हा राबविणार का , असे प्रश्न स्थायी समितीच्या ९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत उपस्थित केले होते. यावेळी, भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी, पालिकेने किती भूखंड मैदानासाठी उपलब्ध केली, त्यासाठी किती निधी वापरला, अशी विचारणा केली होती. त्यावर पालिकेच्या उद्यान विभागातर्फे वरीलप्रमाणे माहिती देण्यात आली.

१ हजार ६८ भूखंड उद्याने, मैदाने, क्रीडांगणांसाठी आरक्षित

मुंबईत उद्याने, मैदाने, क्रीडांगणे यासाठी १ हजार ६८ भूखंड आरक्षित आहेत. त्यापैकी ७० भूभागांवर भारतीय पद्धतीच्या मैदानी खेळांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या विकास कामांसाठी २१ कोटी ५० लाख रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे. उद्याने, मैदाने, क्रीडांगणे यांच्या परिरक्षणासाठी पालिका वेळोवेळी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांची नियुक्ती करते.

तसेच, उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने इत्यादी भूखंड ११ महिने कालावधीसाठी प्रयोजकास परिरक्षणासाठी देण्याबाबतचे धोरण मंजूर झाले असून त्या धोरणाच्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येत आहे, असे पालिकेने म्हटले आहे. दरम्यान, उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने इत्यादी भूखंड दत्तक तत्वावर देण्याबाबतचे नवीन धोरण बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे पालिका उद्याने विभागाने म्हटले आहे.


हेही वाचा : दिशा सालियानचे चारित्र्य हनन, महिला आयोगााने कारवाई करावी, महापौर पेडणेकरांचा राणेंवर पलटवार

First Published on: February 19, 2022 9:17 PM
Exit mobile version