मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आता वर्षानंतरची डेडलाईन

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आता वर्षानंतरची डेडलाईन

मुंबई-गोवा महामार्ग

मुंबई-गोवा महामार्ग कधी चौपदरी होणार आणि कधी मुंबईचा चाकरमानी त्यावरून कोकणात जाणार, ही चिंता प्रत्येक कोकणी माणसाला आहे. मात्र त्याच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण होण्यासाठी अजून एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. तशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक शुक्रवारी मंत्रालयात आयोजित केली होती. बैठकीनंतर मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, मुंबई -गोवा महामार्गाचे काम चार टप्प्यात होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काम सर्वाधिक म्हणजे ९० किमीचे रखडले आहे. एमईपी कंपनीकडे हे काम होते. या कंपनीने बांधकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मुंबई -गोवा महामार्गाच्या संदर्भात आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो. मुंबई-गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील काम एमईपी कंपनीकडून दुसर्‍या कंपनीला दिले आहे. रखडलेले काम सुरु झाले आहे. येत्या पंधरा दिवसात पूर्ण ताकदीने काम सुरु होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील काम एमईपीच्या नाकर्तेपणामुळे थांबले आहे. ते काम पूर्ण होण्यास एक वर्ष लागेल. हे काम मे २०२ १मध्ये पूर्ण होईल असे उदय सामंत यांनी सांगितले.

या बैठकीला खासदार सुनील तटकरे, खासदार विनायक राऊत, परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार हुस्नाबानु खलिफे, आमदार शेखर निकम उपस्थित होते.

कोकणासाठी 300 कोटींची मागणी
दरम्यान कोकणासाठी आम्ही उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे जास्तीत जास्त निधी मागणार आहोत. नियोजन मंडळाचे आराखडे सुमारे २०० कोटी रुपयांचे आहेत. नियोजन मंडळाला ३०० कोटी रुपये मिळावे अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

First Published on: January 18, 2020 7:17 AM
Exit mobile version