हायकोर्टाने फटकारताच प्रशासनाला जाग ! महामार्गांची १५ ऑक्टोबरपूर्वी दुरुस्ती करा

हायकोर्टाने फटकारताच प्रशासनाला जाग ! महामार्गांची १५ ऑक्टोबरपूर्वी दुरुस्ती करा

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व खराब झालेल्या महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून येत्या १५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रीत खडीने भरण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सोमवारी दिले. विशेष म्हणजे मागील आठवड्यात मुंबई हायकोर्टाने रस्त्यावरील खड्ड्यांवरून राज्य आणि केंद्र सरकारांना फटकारले होते. त्यानंतर सोमवारी त्वरीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई- नाशिक, मुंबई- गोवा या महत्त्वाच्या महामार्गांची चाळण झाली आहे. महामार्गांवर मोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महामार्गांवरील खड्ड्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर सौनिक यांनी सोमवारी राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी बैठक घेतली. १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्ग मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या दोन महामार्गांसह राज्यभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच १५ ऑक्टोबरपूर्वी खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश सौनिक यांनी बैठकीत दिले.

राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी कोकणात क्षेत्रीय स्तरावर मुक्कामी राहून युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन वर्दळीच्या आणि जास्त पर्जन्यमान असलेल्या महामार्गांवर पावसाळ्यानंतर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे निर्देशही सौनिक यांनी यावेळी दिले. महामार्ग खराब झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

बैठकीला बांधकाम विभागाचे सचिव अनिल गायकवाड, राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के. सुरवसे आदी उपस्थित होते.

First Published on: September 28, 2021 6:40 AM
Exit mobile version