दरडग्रस्त, मोडकळीस आलेल्या इमारतींकडे लक्ष द्या, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना फर्मान

दरडग्रस्त, मोडकळीस आलेल्या इमारतींकडे लक्ष द्या, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना फर्मान

साकीनाका बलात्कार प्रकरणी एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश

हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित  आणि अनपेक्षितरीत्या घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगून  समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  रविवारी दिले.

पाऊस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटन घडते. मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी आज  मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत ठाकरे यांनी विविध सूचना केल्या.

विशेषत: दरडी  कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटन घडणार नाही याची काळजी घ्या. आज चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीवरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर ढिगारा पसरून प्राणहानी झाली. गेल्या वर्षी मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता.
उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे, असे ठाकरे म्हणाले.

काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी शिरले आणि वाहनांचे नुकसान झाले. तसेच भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याची घटना घडली  हे पाहता अधिक सावधगिरी बाळगावी. पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे ९ जून आणि आत्ता काल झालेल्या पावसाने लक्षात आले. त्यामुळे  रात्री देखील पाणी उपसा करणारी  यंत्रणा, कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे, असे ठाकरे म्हणाले.

सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत. आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहण्यास सांगावे. कोरोना केंद्र आणि  फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स, वैद्यकीय पथकांना मदतीसाठी तयार ठेवावे.
अर्धवट बांधकामे, मेट्रोची  इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे रोग पसरवू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू करण्याची सूचना केली.म₹पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. कोविडचा धोका तर कायम आहे.  हे लक्षात घेऊन ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी आणि मार्गदर्शन व्हावे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत. मात्र अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेत का किंवा त्यांच्या मजबुतीकरणासंदर्भात पाऊले उचलता येतील का ते पाहावे. रेल्वे आणि बेस्ट यामध्ये अधिक चांगला समन्वय साधून अशा आपत्तीच्या वेळी प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून हॉटलाईन सुरु करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

पालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर

मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल म्‍हणाले की,  काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्‍या काही तासांमध्‍ये २०० मिलीमीटरपेक्षा जास्‍त पावसाची नोंद झाली आहे. या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील  पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्‍य एक घटना मिळून एकूण २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्‍यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्‍या स्‍थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्‍यात आले आहे.

उपनगरीय रेल्‍वे रुळांवर साचणाऱया पावसाच्‍या पाण्‍याच्‍या अनुषंगाने चहल म्‍हणाले की, माहूल येथील पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु होणार असून हे केंद्र पूर्ण झाल्‍यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्‍यादी परिसरातील पाणी साचण्‍याचा प्रश्‍न निकाली निघेल. मुंबईत पावसामुळे होणाऱया भूस्‍खलन घटना पाहता, संभाव्‍य  ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्‍थलांतर आणि पुनर्वसन करण्‍याबाबतची कार्यवाही देखील करण्‍यात येत आहे, असेही चहल यांनी सांगितले.

First Published on: July 18, 2021 9:12 PM
Exit mobile version