युतीत दिलजमाई: समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव?

युतीत दिलजमाई: समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव?

समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जाण्याची शक्यता

भाजप – शिवसेना युती होणार की नाही? हा प्रश्न दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना सतावत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून युतीसाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे समजते. समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचा निर्णय भाजपकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे. तसेच २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येऊ शकतात. त्यामुळे दोन्ही पक्षात पुन्हा एकदा युतीचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासहीत शिवसेनेच्या काही नेत्यांनी समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची मागणी केली होती. तर भाजपकडून माजी पंतप्रधान दिवंगत नेते अटल बिहारी वायपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र युती होण्यासाठी भाजपकडून शिवसेनेची मागणी मान्य केली जाण्याची शक्यता आहे.

First Published on: January 11, 2019 1:00 PM
Exit mobile version