एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक, आझाद मैदानावर आंदोलन

एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक, आझाद मैदानावर आंदोलन

एमपीएससी विद्यार्थी आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सरकारी नोकरभरती घोटाळ्याविरोधात पुण्याहून मुंबईला निघालेला एमपीएससी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च आझाद मैदानावर पोहचला. पुण्यातील ४० ते ५० विद्यार्थ्यांचा समावेश असलेला हा लाँग मार्च १९ मे रोजी पुण्यातून निघाला होता. पुण्यावरुन निघालेला हा मोर्चा तळेगाव दाभाडे- कर्जत- कल्याण मार्गे मुंबईत पोहचला.

विविध मागण्यांसाठी लाँग मार्च
एमपीएससीतील डमी रॅकेट प्रकरण, नांदेड पोलीस भरती प्रकरण, परिवहन निरीक्षक भरती आणि शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा याविरोधात सरकारी नोकरी भ्रष्टाचारविरोधी संघर्ष समितीने आंदोलन छेडलं आहे. या घोटाळ्यांची चौकशी करुन गुन्हेगारांना बडतर्फ करावे, अशा विविध मागण्यांसाठी पुणे-मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता.

मुंलुंड टोलनाक्यावर विद्यार्थ्यांना अडवले
१९ मे रोजी निघालेला हा मोर्चा २४ मे रोजी संध्याकाळी आझाद मैदानात पोहचणार होता. मात्र गुरुवारी मुंबईच्या वेशीवर लाँगमार्च पोहचताच पोलिसांनी त्यांना अडवलं. मुलुंड टोलनाक्यावर मुंबई पोलिसांनी हा लाँगमार्च थांबवत विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. आंदोलन करण्यास परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी या सर्व विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन प्रभादेवीच्या भूपेश गुप्ता भवनात रात्रभर ठेवले.

मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन
आंदोलनक विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजता पोलिसांनी सोडले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात या मुलांना आझाद मैदानात नेण्यात आलं. आझाद मैदानावर सध्या या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असून हे विद्यार्थी आपल्या मागण्याचे निवेदन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.

आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या
– महाराष्ट्र राज्य सेवेतील व जिल्हापातळीवरील घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी करावी
– पोलीस भरतीच्या रिक्त जागा तात्काळ भराव्या
– खाजगी कंपनीला सराकारी नोकर भरतीची कंत्राटी कामे देऊ नयेत. राज्यशासनाने त्याबाबत जीआर काढावा
– भगतसिंग रोजगार हमी कायदा महाराष्ट्र सरकारने करावा
– ऑनलाईन परीक्षा रद्द करुन ऑफलाईन पध्दतीने घेण्यात यावी
– महाराष्ट्र राज्य सेवेतील घोटाळ्यांची न्यायालयिन चौकशी व्हावी
– उत्तरपत्रिकेसाठी बारकोट प्रणाली वापण्यात यावी

First Published on: May 25, 2018 9:01 AM
Exit mobile version