Mumbai Police : विनामास्क फिरणाऱ्या १०० जणांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांना टार्गेट

Mumbai Police : विनामास्क फिरणाऱ्या १०० जणांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांना टार्गेट

संपूर्ण देशासह राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. प्रशासनाने आदेश दिल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला दिवसाला १०० विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विनामास्क लोकांवर २०० रूपये दंड

मुंबई शहर आणि उपनगरांत कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. धारावीत सुद्धा कोरोनाचा आलेख वाढत आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसाला १०० कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. विनामास्क असलेल्या लोकांवर २०० रूपये दंड आकारण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. दोनशे रूपयांच्या दंडातील शंभर रूपये हे महापालिकेला जाणार आहेत. तर उर्वरीत शंभर रूपये पोलीस कल्याण निधीमध्ये जमा केले जाणार आहेत.

कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा पोलिसांना अशाच प्रकारचे आदेश देण्यात आले होते. जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांवर कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे पोलीस दलातील ५५ वर्षांवरील वयोगटाच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

मुंबईतील १२० पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मागील २४ तासांत मुंबईतील १२० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच ६४३ पोलीस अधिकाऱ्यांना कोविड-१९ झाला आहे. मुंबई पोलीस दलातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. गृह विभागाकडून पोलीस दलातील अधिकाऱ्यांकरिता व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १ हजार ३१७ पोलीस कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिसांचा देखील समावेश आहे.


हेही वाचा : सोशल मीडियावर स्त्रियांचा अपमान, विरोध करण्यासाठी लोकांनी एकत्र यावं – स्मृती इराणी


 

First Published on: January 11, 2022 9:01 PM
Exit mobile version