आता करा मुंबई – पुणे ‘लोकल’ प्रवास

आता करा मुंबई – पुणे ‘लोकल’ प्रवास

प्रातिनिधिक फोटो

मुंबई – नाशिक लोकल सेवेबरोबरच मुंबई – पुणे या मार्गावरही लवकरच ‘लोकल ट्रेन’ची सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. मुंबई – पुणे या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. हीच व्याप्ती लक्षात घेऊन या मार्गावर खास लोकल सेवा सुरु करण्यात येणार आहे. लवकरच चेन्नईच्या कारखान्यामध्ये या विशेष लोकल गाड्यांची निर्मिती करण्यात येणार असून, पुढील महिन्याभरात प्रत्यक्ष रेल्वे मार्गावर या गाड्यांची चाचणी घेतली जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यामुळे मुंबईवरुन पुण्याला लोकल गाडीने प्रवास करण्याचं प्रवाशांचं स्वप्न येत्या काही काळात पूर्ण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पुण्यातून कामानिमित्त मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. मात्र, सकाळी आठ ते दुपारी साडेतीन या काळात पुण्यातून मुंबईसाठी एकही रेल्वेगाडी नाही. यामुळेच मुंबई-पुणे मार्गावर नियमीत लोकल सेवा सुरु करण्याची मागणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून होत होती.


वाचा : आजचा दिवस ‘संपाचा’… बेस्ट संपाचे पुढे काय? 

मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी डेक्कन एक्सप्रेस, प्रगती, डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी अनेक एक्सप्रेस गाड्या आहेत. मात्र, या मार्गवर नियमित प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असल्याने गर्दीची समस्या हमखास उद्भवते. त्यामुळे या मार्गावर लोकल सुरू झाल्यास गर्दीची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. रेल्वे विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, नव्याने सुरु होणाऱ्या या मुंबई-पुणे लोकल गाडीला १६ ऐवजी ३२ ब्रेक असणार आहेत. सोबतच गाडीच्या इंजिनची क्षमता देखील सध्याच्या लोकलच्या तुलनेत अधिक असणार आहे. ज्यामुळे ही लोकल घाटामधून सुरळीतपणे धावू शकेल.

गर्दी नियंत्रणासोबतच आर्थिकदृष्ट्याही ही लोकल सेवा फायदेशीर ठरणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. रेल्वे सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुंबई – पुणे आणि मुंबई – नाशिक या दोन्ही मार्गावर सुरु होणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना कमीत कमी खर्चात पण वेगवान प्रवास करणं शक्य होणार आहे. तसंच या लोकल सेवेमुळे महामार्गांवर येणारा वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. कर्मचाऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाचा प्रवासही या लोकल सेवेमुळे सुखकर होणार आहे.

First Published on: January 8, 2019 10:30 AM
Exit mobile version