Podar School Bus: शाळेतून मुलांना घरी पोहोचवणाऱ्या बसचा पाच तास नाट्यमय थरार, शाळा प्रशासनाचं स्पष्टीकरण

Podar School Bus: शाळेतून मुलांना घरी पोहोचवणाऱ्या बसचा पाच तास नाट्यमय थरार, शाळा प्रशासनाचं स्पष्टीकरण

podar school

मुंबईः महाराष्ट्र राज्य निर्बंधमुक्त झालं असून, शाळाही सुरू झाल्यात. अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासही सुरुवात केलीय. परंतु मुंबईतल्या सांताक्रूझमधील पोदार शाळेच्या स्कूल बसचा असाच एक भीतीदायक प्रकार समोर आला असून, त्यानं पालकांसह शाळेतल्या शिक्षकांचाही जीव भांड्यात पडला. शाळा सुटल्यानंतर 12.30 वाजल्यापासून शाळेची स्कूलबस नॉट रिचेबल होती. अखेर पाच तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर ती स्कूल बस घेऊन मुलांना शाळेत परतली असून, मुलांच्या पालकांनीही सुटकेचा निःश्वास टाकला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

मुंबईच्या सांताक्रूझमधील पोदार ही शाळा 12.15 च्या सुमारास सुटली, त्यानंतर सगळे विद्यार्थी स्कूल बसमध्ये बसले आणि स्कूल बस मुलांना घरी पोहोचवण्यासाठी मार्गस्थ झाली. पण 12.30 वाजल्यापासून शाळेच्या स्कूलबसचा शाळेशी संपर्क तुटला. त्यानंतर ती बस जवळपास पाच तास गायब होती. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेत येऊन पोदार स्कूल प्रशासनाशी वाद घातला. पण शाळेलाच काही माहीत नसल्यानं पालकांनी चांगलाच धिंगाणा घातला. सांताक्रूझ पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचत परिस्थितीचं गांभीर्य जाणून घेतलं. तसेच भाजपचे नेते आशिष शेलार यांनीसुद्धा स्कूल प्रशासनाला यासंदर्भात जाब विचारलाय. बराच वेळ स्कूल बसच्या ड्रायव्हरशीही संपर्क होऊ शकला नव्हता. तब्बल तीन तास स्कूल बसमधील ड्रायव्हर आणि क्लिनरसोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर संध्याकाळी 4.30 वाजता बस शाळेत परतली आणि पालकांसह शाळेचं टेन्शन गेलं.

विशेष म्हणजे पोदार ही सांताक्रूझमधील नावाजलेली शाळा असून, तिची फीसुद्धा भरमसाठ आहे. एवढी चांगली फी भरूनही मुलांना घरी सोडणाऱ्या स्कूल बसचा सुरक्षितेतवर या निमित्तानं प्रश्न उपस्थित झाला असून, पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केलीय. शाळेच्या फॅसिलिटीसाठी एवढे पैसे मोजूनही इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकता?, असा प्रश्न उपस्थित करत पालकांनीही शाळा प्रशासनाला भंडावून सोडलं आहे.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

सांताक्रूझ येथील पोदार शाळेची बस बेपत्ताप्रकरणी मी पोलीस आयुक्त, डीसीपी या पोलीस यंत्रणांसह शाळेच्या प्रशासनाशी तातडीने बोललो. त्यातून जी माहिती समोर आली त्यानुसार बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने नेहमीच्या मार्गापेक्षा अन्य मार्गाने बस गेली. विद्यार्थी सुखरूप असून आपापल्या पालकांकडे पोहोचले आहेत. चिंता करण्याचे कारण नाही, असे पोलीस, शाळा यांनी सांगितले आहे. जरी असे असले तरी संबंधित ड्रायव्हर, बसचा कंत्राटदार यांच्यावर कारवाई करा, असे शाळेच्या प्रशासनाला सूचित केले आहे.

सर्व प्रकरणावर पोदार शाळेचं स्पष्टीकरण

या सर्व प्रकरणावर पोदार शाळेनं स्पष्टीकरणही दिलंय. नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळेच्या पहिल्या दिवसासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. परंतु झालेल्या प्रकारानंतर सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची खातरजमा करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्या घरी त्यांना सुखरूप पोहोचवले आहे. आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आज स्कूल बसच्या सेवेला विलंब झाल्यानं हा प्रकार घडला. वाहतूक सेवा सुनिश्चित करण्यासाठी स्कूल बस चालक आणि क्लिनर यांना पूर्णपणे पुन्हा प्रशिक्षित केले जात आहे. येत्या काही दिवसांत ते व्यवस्थित प्रशिक्षित होतील. आम्ही विद्यार्थी आणि पालकांचे त्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत आणि भविष्यात आजच्या समस्यांची पुनरावृत्ती होणार नाही, याचं आश्वासन देत असल्याचंही शाळा प्रशासनानं सांगितलंय.

First Published on: April 4, 2022 7:43 PM
Exit mobile version