मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 4 नोव्हेंबरपासून

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 4 नोव्हेंबरपासून

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. या पदवी परीक्षा 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तसेच, पदव्युत्तर परीक्षा नव्या वर्षात (2023) होणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर परीक्षा तयारीसाठी कमी वेळ मिळात होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या आधी परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता. त्यानुसार, सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. (mumbai university winter session revised exam dates announced)

तृतीय वर्ष पदवी कला व विज्ञान शाखेच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये नियोजित असलेल्या पाचव्या सत्राच्या परीक्षा 4 नोव्हेंबरपासून तर वाणिज्य शाखेच्या 18 नोव्हेंबरपासून सुरु होतील. त्याचबरोबर पदव्युत्तर प्रथम वर्ष कला व विज्ञान शाखेच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा या 28 डिसेंबर, वाणिज्य शाखेच्या 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील.

पदव्युत्तर द्वितीय वर्ष कला व विज्ञान शाखेच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षा या 29 डिसेंबर आणि वाणिज्य शाखेच्या 21 फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होतील. त्याचसोबत द्वितीय सत्राच्या हिवाळी परीक्षा, ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा 22 ऑक्टोबरपर्यंत घेऊन निकाल जाहीर करावे.

हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाकडून दरवर्षी चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेतल्या जातात. विद्यापीठाने 2022 च्या हिवाळी सत्राच्या मानव्यविद्याशाखेच्या एकूण 80 परीक्षा, वाणिज्य विद्याशाखेच्या 96 परीक्षा, विज्ञान विद्याशाखेच्या 94 परीक्षा तर आंतर विद्याशाखेच्या 109 अशा 379 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

तंत्रज्ञान विद्याशाखेच्या आणि दूर-मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. सर्व विद्याशाखेच्या सर्व परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


हेही वाचा – उत्तराखंडमध्ये पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये राडा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू

First Published on: October 13, 2022 8:29 AM
Exit mobile version