महापालिकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रच लढणार

महापालिकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रच लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विशेषत: महापालिकेच्या निवडणूका या महाविकास आघाडी करुन लढायच्या असे आम्ही ठरवले आहे. एकत्र लढल्यामुळे काय निकाल लागतो हे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अनुभवले असल्याची महत्वपूर्ण माहिती खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये शनिवारी (दि. १२) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असेल हे स्पष्ट झाले आहे.
काय म्हणाले खा. संजय राऊत?
महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने नाशिकपासून काम सुरु केले आहे असे सांगत खा. राऊत पुढे म्हणाले की, महापालिका निवडणूक तोंडावर आहे. राजकीय वातावरण बदलले आहे. यापूर्वी तयारी वेगळी केलेली होती. आता नव्याने परत तयारी करावी लागेणार आहे. पण महापालिकेवर भगवा फडकणार इतकेच मी सांगू शकतो. आमच्या संघटनेत आता हळूहळू वेगळे विचार प्रवाह सुरु करतोय. इथून गेल्यावर मी पक्षप्रमुखांशी बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये राष्ट्रवादीने ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर, राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचा निर्णय शेवटी मुंबईतीलप्रमुख नेत्यांच्या बैठकीत ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या. एकत्र लढल्याने काय निकाल लागतो हे आपण परवाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत अनुभवले. पदवीधर आणि शिक्षक फार काळजीपूर्वक मतदान करतो. नागपूरपासून पुण्यापर्यंत जे थेट मतदान झाले. या मतदारांनी जो कौल दिलातो जनतेची नाडी समजतो. हवा कशी बदलते आणि कुठल्या दिशेने वाहते हे आता लक्षात येत आहे. काही भाजपचे नेते म्हणत होते की, आम्हाला लोकमताचा पाठिंबा नाही. जेव्हा बहतुमताचा आकडा एकत्र येतो ते बहुमतच असते. सत्ता स्थापनेनंतर झालेली ही पहिली निवडणूक. त्यात विरोधकांचे बालेकिल्ले ढासळून गेले. नागपूर आणि पुण्यातील भाजपच्या परंपरागत बोलेकिल्ल्यात इतरांना शिरकाव करायलाही आतापर्यंत वाव नव्हता. तेथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा वर्षभर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिलेला आहे. जो काम करतो त्या सरकारच्या बाजूने जनतेचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: महापालिका एकत्र लढल्या तर तिथे हाच निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनही पक्षाचे नेते आम्ही एकत्र बसू. मुंबई महापालिकेत पहिल्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना आहे. नाशिकमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष शिवसेना असला तरी महाविकास आघाडीत मात्र आमचा पहिलाच क्रमांक लागतो. अर्थात सगळ्याच मतदार संघात प्रत्येकाचा सन्मान राखून बेरीज करावी आणि निवडणुका लढवाव्यात असे आमचे ठरलेले आहे. हैद्राबादमध्ये भाजपला ओवीसी मिळाले. मुंबईत तसा कोणी ओवीसी मिळतो का ते पाहू. पण कुणीही कोणासोबत जरी गेले तर सत्ता शिवसेनेचीच येणार हे स्पष्ट असल्याचेही राऊत म्हणाले.

First Published on: December 12, 2020 4:10 PM
Exit mobile version