पुण्यात मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागात अल्पवयीन मुलाची हत्या, आरोपी फरार

पुण्यात मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागात अल्पवयीन मुलाची हत्या, आरोपी फरार

प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी 12:15 वाजताच्या सुमारास घडली. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. (murder in pune minor boy was killed in broad due to love affair)

नेमके प्रकरण काय?

नागेश सिध्दाप्पा चिंचोळे (17) असे खून झालेल्याचे नाव आहे. नागेश हा वडगाव बुद्रुक परिसरातील जाधवनगर येथे राहत होता. नागेश हा परिसरातील पाऊंजाई मंदिरामागील घुले नगर भागात असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये मैत्रिणीबरोबर बोलत बसला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात बिअरची बाटली आणि रोपटे असलेली कुंडी घातली.

त्यानंतर, नागेश रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडला व जागीच मृत झाला. हल्लेखोर पसार झाले आहेत. या घटनेनंतर तातडीने पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आले. त्यावेळी सिंहगड रोड पोलीसठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच, अधिक तपास केला असता, प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. शिवाय, पंचनामा करून गुन्हा दाखल केल्याचे समजते.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज भरदिवसा अल्पवयीन मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस हल्लेखोराच्या मागावर असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितल्याचे समजते.


हेही वाचा – पुण्यात पीएफआयच्या विरोधात मनसे-युवासेना आक्रमक, पाकिस्तानचा झेंडा जाळला

First Published on: September 25, 2022 9:23 PM
Exit mobile version