Raigad Murud Fishermen angry : महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाविरोधात मुरुडच्या मच्छीमारांनी थोपटले दंड

Raigad Murud Fishermen angry : महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाविरोधात मुरुडच्या मच्छीमारांनी थोपटले दंड

जंजिरा किल्ल्याच्या मागच्या बाजूला जेट्टीचे काम सुरू आहे.

मुरुड : ऐतिहासिक जलदुर्ग जंजिऱ्याच्या मागील बाजूस पर्यटकांना उतरण्यासाठी जेट्टी बांधण्याचे काम सुरू आहे. याचा मच्छीमारांना मोठा त्रास होत आहे. याबाबत मच्छीमारांच्या तक्रारीला सरकार जुमानत नसल्याने आता हे प्रकरण कोर्टात गेले आहे. मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी महालक्ष्मी मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

जंजिरा किल्ल्यामागील जेट्टीसाठी समुद्रातील पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी २४० मीटरची संरक्षक भिंत बांधली जात आहे. या कामामुळे मच्छीमारीवर परिणाम झाला आहे. मच्छीमारांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मच्छीमारांनी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडे तक्रारी करूनही काहीही उपयोग झालेला नाही. म्हणूनच मच्छीमारांना न्याय मिळवून देतानाच त्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी महालक्ष्मी मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटी मार्फत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचे काम अॅ़ड. महेश मोहिते आणि अॅड. अजित आनंद पाहत आहेत.

हेही वाचा… Raigad Nandgaon Fishing News : राजपुरी बंदरात मच्छीचा दुष्काळ, जवळा-कोळंबी गायब

जेट्टीसाठी बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीमुळे मच्छीमारांना रावस, जिताडा, पापलेट, कोलंबी, शेवंड आदी मच्छी मिळणे कठीण होणार आहे. शिवाय संरक्षक भिंतीमुळे बोटीचा मार्ग बदल्यामुळे बोटींच्या डिझेल खर्चातही वाढ होणार आहे. दिघी पोर्टसाठी चॅनेल टाकल्याने अगोदरच रोजगारावर गदा आली असून उपासमारी वाढली आहे. म्हणूनच वांद्रे-वरळी सीलिंक बांधताना जशी मच्छीमारांना भरपाई दिली तशीच इथल्या मच्छीमारांना नुकसाभरपाई मिळावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

हेही वाचा… Raigad karjat tree cutting : अधिकारी निवडणूक कामात, वृक्षतोड जोरात

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. यावेळी सुनावणीसाठी मच्छीमार संस्थेचे सचिव सीताराम आगरकर, भालचंद्र आगरकर, नारायण चव्हाण, मुरलीधर घागरी आदी उपस्थित होते.

नुकसानभरपाई मिळावी

जंजिऱ्या किल्ल्यामागील जेट्टी आणि संरक्षक बंधाऱ्यामुळे मच्छीमारांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. विकास करताना मच्छीमारांना भकास करू नका, ही आमची भूमिका आहे. वरळी सीलिंक बांधताना स्थानिकांना भरपाई दिली होती. त्याच धर्तीवर येथील सुमारे ३०० हून अधिक मच्छीमारांना कायमस्वरूपी नुकसानभरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत. – अॅ़ड. महेश मोहिते

First Published on: April 26, 2024 12:39 AM
Exit mobile version