घरमहाराष्ट्रकोकणRaigad Nandgaon Fishing News : राजपुरी बंदरात मच्छीचा दुष्काळ, जवळा-कोळंबी गायब

Raigad Nandgaon Fishing News : राजपुरी बंदरात मच्छीचा दुष्काळ, जवळा-कोळंबी गायब

Subscribe

ऐन हंगामात मच्छी मिळत नसल्याने मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच होड्यांच्या देखभालीचा वाढता खर्च, आजारपण शिवाय संसार चालवण्याची ओढाताण अशातच मच्छीचा दुष्काळ पडल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.

उदय खोत : आपलं महानगर वृत्तसेवा

नांदगाव : ऐन मच्छीच्या मोसमात मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध राजपुरी बंदरात मासळीचा दुष्काळ पडला आहे. सफेद कोळीम किंवा कोळंबीही मिळत नसल्याने मच्छीमार आणि मच्छीविक्रेते मेटाकुटीला आले आहेत. होळीपासूनच (२३ मार्च) राजपुरी बंदरात अशीच भीषण परिस्थिती आल्याने सुमारे ८० नौका समुद्रात नांगरून ठेवण्यात आल्यात, अशी माहिती राजपुरी येथील ज्येष्ठ मच्छीमार नाखवा धनंजय गिदी यांनी ‘आपलं महानगर’ला दिली.

एप्रिलच्या हंगामात राजपुरी बंदरात सफेद कोळीम (जवळा), कोळंबी, मांदेली अशी मिक्स मच्छी मोठ्या प्रमाणांत आढळते. या मच्छीला चांगली मागणी असल्यामुळे कोळी भगिनी मुरूड शहर, शिघ्रे, खारआंबोली, जोसरंजन, नांदगाव, विहुर, तेलवडे, आगरदांडा आदी गावामध्ये घरोघरी मच्छी विकायला जातात. यातून मच्छीमार, कोळी कुटुंबांचा संसार चालतो. पण या हंगामात जाळ्यात ही मच्छी सापडत नसल्याने विक्री दूरच खायलाही मच्छी मिळत नाही, अशी मच्छीमारांची तक्रार आहे. एकदरा येथील मच्छीमारांच्या जाळ्यात अगदी अल्प प्रमाणात कोळंबी आणि सफेद कोळीम सापडत असल्याने त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad RTE admission : आरटीई प्रवेशावर पालकांचा सवाल

ऐन हंगामात मच्छी मिळत नसल्याने मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच होड्यांच्या देखभालीचा वाढता खर्च, आजारपण शिवाय संसार चालवण्याची ओढाताण अशातच मच्छीचा दुष्काळ पडल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. राजापुरी बंदरात अशी स्थिती उद्भवल्याने सरकारने याबाबत अभ्यास किंवा संशोधन करावे, अशी मागणी मच्छीमार करत आहेत. राजपुरी बंदराजवळ मच्छी सुकवण्यासाठी सरकारने दोन-तीन प्रशस्त सिमेंटचे चौथरे बांधले पण मच्छीच नसल्याने हे चौथारे उन्हात ओस पडले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Murud Fishing News : मुरुड-जंजिऱ्याचे मच्छीमार ‘चप्पल’मुळे मालामाल

खाडीपट्ट्यातूनही कोळंबी गायब

राजपुरीप्रमाणेच परिसरातील खाडीपट्यातही सफेद कोळीम आणि कोलंबी मिळत नाही. खामदे, मजगाव, दिघी, कुडगाव, हरवीत, मेदडी, वाशी, मांदाड, राहाटाड, मजगाव, बंदरकाठा, नांदगाव, तुरुंबाडी आदी खाडीपट्ट्यातून ही मासळी सध्या गायब झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मच्छीमार आर्थिकदृष्ट्या जेरीस आला आहे.

कोळंबीचे सोडे महागले

खाडीपट्ट्यात कोळंबी मिळत नसल्याने कोळंबीचे प्रसिद्ध सोडे महागले आहेत. सोड्याचा भाव १८०० रुपयांवर पोहोचला आहे. सोडे तळून (फ्राय) भाकरीसोबत खाण्याची लज्जत न्यारी असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -