प्लास्टिक संदर्भात नागपूर महापालिकेचा मोठा निर्णय, १ जुलैपासून करणार धडक कारवाईला सुरूवात

प्लास्टिक संदर्भात नागपूर महापालिकेचा मोठा निर्णय, १ जुलैपासून करणार धडक कारवाईला सुरूवात

प्लास्टिक संदर्भात नागपूर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात पालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येणार आहे. १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याबाबत केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०२१ रोजी अधिसूचना जारी केली. त्यानुसार ही कारवाई केली जाणार आहे.

प्लास्टिक बंदीच्या संदर्भात मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात मनपा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनपाचे मुख्य अभियंता प्रदीप खवले यांच्यासह इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी राहील, असे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने दिले आहेत.

येत्या १ जुलैपासून प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत बाजारपेठ, दुकाने आणि आस्थापनांमध्ये तपासणीची धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक साहित्याचा वापर आणि साठवणूक आढळल्यास महाराष्ट्र विघटनशील कचरा नियंत्रण कायदा २००६ अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८चे उल्लंघन केल्या प्रकरणी नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

कोणत्या वस्तूंवर होणार कारवाई?

सजावटीसाठीचे प्लास्टिक आणि पॉलिस्टीरिन (थर्माकोल), मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पाकिटं, प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणाऱ्या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप आणि ग्लासेस आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.


हेही वाचा : तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा, खासदार उदयनराजेंचं अजित पवारांना आव्हान


 

First Published on: June 17, 2022 9:24 PM
Exit mobile version