संपाचा नागपूरमध्ये आरोग्य सेवेला मोठा फटका; मेयो, मेडिकलमध्ये 6 दिवसांत 109 रुग्णांचा मृत्यू

संपाचा नागपूरमध्ये आरोग्य सेवेला मोठा फटका; मेयो, मेडिकलमध्ये 6 दिवसांत 109 रुग्णांचा मृत्यू

संपकाळात नागपूरमधील मेयो, मेडिकलमध्ये 109 रुग्णांचा मृत्यू

मागच्या आठवड्यात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी काम बंद आंदोलनावर गेले होते. मागच्या सहा दिवसांपासून सुरु असलेला संप अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला. परंतु परिचारिकांच्या संपामुळे नागपुरातील मेयो आणि मेडिकलमधील आरोग्य सेवा कोलमडली आहे. नागपूरमधील मेडिकलमध्ये 82 तर मेयोमध्ये 27 रुग्णांचा मृत्यू झाला. मेयो मेडिकलमधील 1 हजार 200 परिचारिका आणि लिपिक, चतुर्थ श्रेणी कामगार संपावर गेले होते. संप मागे घेतल्यानंतर आता मंगळवारपासून म्हणजेच 21 मार्चपासून कर्मचारी कामावर रुजू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या संपकाळात मेडिकलमध्ये 82 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 12 महिलांची प्रसूती झाली. मेयोमध्ये 27 रुग्ण दगावले, तर 10 महिलांची प्रसूती झाली. मेडिकलमध्ये 17 मार्च रोजी सर्वाधिक 23 तर मेयोत 19 मार्च रोजी 11 रुग्णांचा मृत्यू झाला. संपकाळात नागपूरमधील परिचारिका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट व चतुर्थ श्रेणी कर्मचारीही संपावर असल्याने मेयो, मेडिकलमधील हजारो ऑपरेशन्सही पुढे ढकलण्यात आले. तसेच, प्रसुतीसाठी आलेल्या महिलांनाही खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. संपकाळात कंत्राटी परिचारिका बोलवण्यात आल्या होत्या.

संपकाळात कामावर नसणा-यांच्या वेतनात कपात?

मेयो आणि मेडिकलमधील रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याने निवासी डाॅक्टरांच्या माॅर्ड संघटनेने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून संप मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. तसेच, संपकाळात जे कामावर नव्हते त्यांच्या वेतनात कपात करण्याची मागणीही केली जात आहे.

राज्यात केवळ नागपूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अशी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. येथील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यासह विद्यार्थ्यांना अद्ययावत वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी शासनाने येथे पदव्युत्तर जागा मंजूर केल्या आहेत.

( हेही वाचा: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे )

संप मागे घेतल्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

सरकारी कर्मचा-यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. कर्मचा-यांच्या मागणीबाबत शासन पूर्णत: सकारात्मक असून याकरता स्थापन समितीचा अहवाल लवकर मिळवून उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषद, विधानसभेत जाहीर केले.

First Published on: March 21, 2023 11:58 AM
Exit mobile version