नाका कामगारांना निवडणुकांमुळे आले ‘अच्छे दिन’; रोजंदारी, पोटापाण्याचा प्रश्न सुटला

नाका कामगारांना निवडणुकांमुळे आले ‘अच्छे दिन’; रोजंदारी, पोटापाण्याचा प्रश्न सुटला

प्रातिनीधीक फोटो

आता पूर्वीसारखे निवडणुकांमध्ये घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे कार्यकर्ते उरले नाहीत. त्यामुळे उमेदवारांना गर्दी जमविण्यासाठी वेगळ्या क्लृत्या लढवाव्या लागतात, हे उघड गुपीत आहे. सध्याच्या निवडणुकीत एरवी कामासाठी नाक्यावर तासन् तास तिष्ठत उभे रहावे लागणाऱ्या नाका कामगारांना सुगीचे दिवस आले आहेत. बहुतेक कामगार मंडळी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाली असल्याने छोटी मोठी कामे करणाऱ्या कंत्राटदारांना कामगार मिळेनासे झाले आहेत.  निवडणूकीत प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुका आणि सभांना लागणारी गर्दीसाठी मोठ्या प्रमाणात कामगारांचा वापर केला जात आहे. परिणामी सध्या नाका कामगारांना अच्छे दिन आले आहेत.

एरवी ठाण्यातील कळवा नाका, जांभळी नाका, कापूरबावडी नाका या ठिकाणी सकाळी नऊनंतर हे कामगार कामाच्या शोधात थांबत असतात. सध्या मात्र  त्यांचा दिनक्रम  अकरानंतर सुरू होतो.  उमेदवारांच्या प्रचार फेºया, त्यानंतर दुपारी जेवण आणि संध्याकाळच्या वेळी पुन्हा प्रचार फेºया असा दिवसाचा कार्यक्रम ठरलेला आहे. रोजंदारीवर काम करणाºया या कामगांरांना दिवसाचे ३०० ते ५०० रुपये मिळतात. शिवाय येण्या-जाण्यासाठी पक्षाकडून वाहन व्यवस्था आणि विनामूल्य पोटभर खाण्यापिण्याची व्यवस्था केली जात आहे. तसेच रोख रकमेच्या स्वरुपात दररोज पैसे दिले जात आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे तसेच किरकोळ वेतन असलेले अनेक कामगार सध्या इतर कामें सोडून पूर्णवेळ राजकीय पक्षांसाठी कार्यरत झाले आहेत.

सभांना गर्दी असेल तरच त्या नेत्यांचा प्रभाव पडतो. वर्तमानपत्रेही त्याची दखल घेतात. गर्दी नसेल तर उलटा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्दी जमविण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते ही शक्कल लढविताना दिसतात.

उमेदवार कोण आहे किंवा पक्ष कोणता आहे याबाबत आम्हाला काही देणे घेणे नाही. आम्हाला आमचा रोजगार आणि चहापाणी नाष्टा जेवणाची सोय होते. शिवाय सध्या निवडणुकीमुळे अनेक छोटी कंत्राटदारांची कामे बंद आहेत.  त्यामुळे आम्ही या कामाला जातो.  – रामवत बिश्वाकर्मा ,  नाका कामगार, कळवा

वडापाव, कटींग आणि दालराईस

सकाळी नाक्यावर पक्ष ठरल्यावर चहा, वडा किंवा समोसापाव, ईडली, दुपारी पुलाव राईस, दाल राईस, बिर्याणी किंवा राईस प्लेटही दिली जाते. पक्ष पदाधिकाऱ्यांना १०० माणसांपासून पुढील संख्येने गर्दी जमवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार कामगारांच्या समुहांची निवड होते. काही पक्षांकडून कामगार उपलब्ध करून देणाऱ्या कामगारांच्या म्होरक्याला कमिशन दिले जाते.

First Published on: April 16, 2019 5:35 PM
Exit mobile version