‘यूपीए’चा सातबारा काँग्रेसच्या नावावर, त्यातील बदलाशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही”

‘यूपीए’चा सातबारा काँग्रेसच्या नावावर, त्यातील बदलाशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही”

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावं, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मंजूर केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेय. शिवसेनेनंही आपलं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला महत्त्वाचा सल्ला दिलाय. ‘यूपीए’चा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे. त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणे शक्य दिसत नाही, असं सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे आता यूपीएचा पुढचे अध्यक्ष शरद पवार होणार का?, या चर्चांनी जोर धरलाय.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?

विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे सर्वात आधी ‘यूपीए’चा जीर्णोद्धार करणे. ‘यूपीए’चा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे. त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणे शक्य दिसत नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के.सी. राव, एम. के. स्टॅलिन हे सर्व तालेवार लोक आहेत व नव्या एकजुटीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही म्हणून ममता बॅनर्जी यांना पुढे यावे लागले. त्यांनी ‘पुरोगामी’ शक्तींना साद घातली आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाला तो समोर सेक्युलरवादाचे अजीर्ण झाल्यामुळे. देश सगळय़ांचा आहे, पण बहुसंख्य हिंदू समाज देशाचा मुकुटमणी आहे. विरोधकांच्या नव्या आघाडीने या विचाराचे भान ठेवले तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व ‘यूपीए’चा जीर्णोद्धार शक्य आहे.

ममता बॅनर्जी यांनी अशा सर्व मुख्यमंत्र्यांना आणि पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सर्व ‘पुरोगामी’ शक्तींनी एकत्र येऊन भाजपच्या मनमानी, एकाधिकारशाहीशी लढा द्यावा, असे ममतांनी काँग्रेससह अन्य पक्षांच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ममतांनी हे पत्र काँग्रेसच्या प्रमुखांनाही लिहिले आहे. म्हणजे काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही हे त्यांनी मान्य केले. काँग्रेस हा विरोधी पक्ष म्हणून टिकलाच पाहिजे. काँग्रेस संपता कामा नये, असे मत नितीन गडकरींसारख्या भाजपच्या नेत्याने, केंद्रीय मंत्र्याने मांडले. याचा अर्थ असा की, दिल्लीत सध्या जी राजकीय व्यवस्था आहे, त्यांना विरोधी पक्षाचे अस्तित्वच नष्ट करायचे आहे. अशी तयारी काही मंडळींनी सुरूही केली आहे.

जसे बहुमत उत्तर प्रदेशात व अन्य राज्यांत भाजपला मिळाले तसेच ते पंजाबात ‘आप’ला मिळाले. ‘आप’ आता हिमाचल, हरयाणात कामास लागला आहे. त्यामुळे घाबरून केंद्राने त्यांच्या नाडय़ा आवळायला सुरुवात केली आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांच्या एकजुटीच्या आवाहनास अरविंद केजरीवाल प्रतिसाद देणार आहेत काय? प. बंगालातील विधानसभेत भाजप व तृणमूलमध्ये दंगल झाली. वीरभूमीतील हिंसा निषेधार्ह आहे, पण त्या हिंसेवर पाणी टाकण्याऐवजी तेल ओतण्याचे काम तेथील भाजपवाले करीत आहेत. वीरभूमी हिंसेच्या निमित्ताने ममतांचे सरकार बरखास्त करण्यासाठी जर भाजपचे हे अघोरी प्रयोग असतील तर ते योग्य नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजप येथील महाविकास आघाडी सरकार उलथवू पाहत आहे.


हेही वाचाः विरोधी पक्ष हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अराजक निर्माण करतोय, संजय राऊतांचा घणाघात

First Published on: March 31, 2022 10:19 AM
Exit mobile version