ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही, जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर नाना पटोलेंचा संताप

ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही, जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर नाना पटोलेंचा संताप

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वी महाड येथे सभा झाली. या सभेतून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मात्र, या सभेदरम्यान काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंवर तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला.

नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले होते की, आपण असं करू नका. परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षालाच कमजोर करण्याचे काम होत असेल तर ते चुकीचे आहे, असं नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडीची बैठक होईल, तेव्हा याविषयावर आपण चर्चा करू. महाडची ती जागा काँग्रेस पक्षच लढवेल, असंही स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलं आहे. त्यामुळे आता महाडच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून त्यांनी महाडचे नगराध्यक्षपद सांभाळले आहे. अनेक वर्ष काँग्रेस पक्षासोबत असलेल्या स्नेहल जगताप यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर महाड येथील ठाकरेंच्या भरसभेत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. स्नेहल जगताप यांच्यासोबत काँग्रेसचे हनुमंत जगताप, संदीप जाधव, राजेंद्र कोरपे, धनंजय देशमुख, श्रीधर सकपाळ यांनीही ठाकरे गटात प्रवेश घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

नाना पटोले यांनी एका मुलाखतीदरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत भाष्य करत भूमिका मांडली. आतापर्यंतची जी लोकशाहीची परंपरा आहे, ती म्हणजे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो, तशीच भूमिका घेतली जाईल. परंतु जर कोणत्याही कारणामुळे आमच्यात आघाडी झाली नाही तर काँग्रेसचा प्लॅन बी तयार आहे. कारण, 2014 मध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री आणि जागावाटपाबाबत काँग्रेस सतर्क असणार आहे, असं नाना पटोले म्हणाले होते.


हेही वाचा : नितीश कुमार बांधणार विरोधकांची मोट, मुंबई दौऱ्यात ठाकरेंसह घेणार पवारांची भेट


 

First Published on: May 8, 2023 12:15 PM
Exit mobile version