भाजपविरोधात लढण्यासाठी नाना पटोलेंनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

भाजपविरोधात लढण्यासाठी नाना पटोलेंनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

सध्या देशात भाजपविरोधात लढण्यासाठी अनेक विरोधी पक्षातील नेते सोबत येत आहेत. तर लोकशाही वाचविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज आहे, असे वारंवार विरोधी पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून भाजप विरोधात लढण्यासाठी जे पक्ष एकत्र येतील, त्यांना बरोबर घेण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून देण्यात आली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “देशातील सर्व स्वायत्त संस्थांमध्ये मोदी सरकारचा हस्तक्षेप वाढलेला आहे. न्याय व्यवस्था देखील यातून सुटलेली नाही. निवडणूक आयोगाची स्थिती आपण पहिली आहे. निवडणूक आयोगाच्या प्रकरणात तर सुप्रीम कोर्टाला देखील लक्ष घालावे लागले आहे. प्रशासकीय व्यवस्थेत सुद्धा केंद्र सरकारकडून हस्तक्षेप केला जात आहे.”

तसेच देशातील राजकीय परिस्थिती चिंताजनक होत चालल्याने लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. रायपूरमध्ये नुकत्याच झालेल्या महाअधिवेशनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या महाअधिवेशनात भाजप विरोधात लढण्यासाठी जे राजकीय पक्ष बरोबर येतील त्यांना सोबत घेण्याची भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी नाना पटोले यांच्याकडून देण्यात आली.

हेही वाचा – हसन मुश्रीफांच्या मुलांवर तूर्तास कारवाई नाही; ईडीकडून कोर्टात देण्यात आली माहिती

तसेच पुधेंड बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपचे विरोधक असलेल्यांच्या मतदारसंघात कामे होऊ दिली जात नाही. सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यास कारवाई केली जाते. जनतेचे प्रश्न उपस्थित केले सर्व चौकशी करण्यात येते आणि मग मतदारसंघात सुरु असलेली कामे थांबवली जातात. विरोधकांची दडपशाही करण्याचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा राबवला जात आहे, हे जे अशोक चव्हाण बोलले होते, ते अगदी खरे आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

भाजप सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. उद्योगपतींना फायदा व्हावा, यासाठी भाजप सरकार काम करत आहे. तर मानवी गरजांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या मुद्द्यांवर लक्ष वळवण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे. जातीय तणाव वाढत चालला आहे. हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून सामाजिक एकतेला तडा देण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला.

First Published on: March 6, 2023 6:02 PM
Exit mobile version