Corona Vaccination: केंद्र सरकारने राज्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन द्यावी, नाना पटोले यांची मागणी

Corona Vaccination: केंद्र सरकारने राज्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन द्यावी, नाना पटोले यांची मागणी

काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांची मागणी मान्य करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा घेतलेला निर्णय रास्तच असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या निर्णयाचे स्वागत करत आहे. या वयोगटातील लोकसंख्या पाहता लसीकरण केंद्रावर गर्दी न होता ही मोहिम सुरुळीत पार पडावी यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. येत्या १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जारी केले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी तसेच खा. राहुल गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लस ही सर्वांना मोफत द्यावी अशी आग्रही मागणी केली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मोफत लसींसाठी आग्रही भूमिका मांडत पाठपुरावाही केला. कोरोनावर मात करण्यासाठी लस हेच प्रभावी शस्त्र आहे. जगभरातील अनेक देशांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जात असताना केंद्र सरकार मात्र त्याबाबत चालढकल करत होते. केंद्र सरकारने शेवटी १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला परंतु त्याची जबाबदारी मात्र राज्य सरकारवरांवर ढकलून जनतेला वा-यावर सोडले आहे. पण महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मात्र सोनिया गांधी यांची मागणी मान्य करून मोफत लसीकरणाचा निर्णय घेऊन जनतेप्रति आपली बांधिलकी जपली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झालेले असतानाही राज्य सरकारने नियोजनपूर्वक कार्यक्रम हाती घेऊन एकीकडे कोरोना रुग्णांवर योग्य उपचार तर दुसरीकडे व्यापक प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेतली. महाराष्ट्राने आतापर्यंत १.५० कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करून देशात आघाडी घेतली आहे. राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे. दररोज आठ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. आता केंद्र सरकारने कोणताही दुजाभाव न करता महाराष्ट्राला लसींचा मुबलक पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

First Published on: April 28, 2021 8:02 PM
Exit mobile version