नाना पटोले विरूद्ध किसन कथोरे; विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस

नाना पटोले विरूद्ध किसन कथोरे; विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस

नाना पटोले विरूद्ध किसन कथोरे

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कोण या चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीचं उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. तर महाविकास आघाडीची बहुमत चाचणी आज, शनिवारी विधानसभेत होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हे अर्ज दाखल करणार आहेत. तसेच भाजप पक्षातर्फे मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी पटोले आणि कथोरे यांच्यामुळे चुरस रंगणार आहे. आज, दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करायचा आहे.

‘काँग्रेसकडून नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतील. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विधीमंडळ कामकाजाचा अनुभव आहे,’ अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी किसन कथोरे यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी जाहीर केले.

कोण आहेत किसन कथोरे

किसन कथोरे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ८५ हजार ५४३ मतांनी विजयी झाले होते. तर २०१९ लाही ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात उभे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गोटीराम यांचा २६ हजार २३० मतांनी पराभव केला होता. भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून शेतकी संस्था स्थापन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उल्हासनगरच्या न्यायालयाने दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे सनदी अधिकारी आर. ए. राजीव आणि काही मृत व्यक्तींच्या नावाचाही यात समावेश आहे. अंबरनाथ तालुक्यातील ‘सागाव परिसर विविध कार्यकारी सेवा संस्था’ ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या अधीन राहून नोंदणीकृत करण्यात आली होती. मात्र यात नाव आल्याने शिवसेनेचे प्रभु पाटील यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून या माहिती मिळवली. यात त्यांच्या नावासह इतर काही व्यक्तींच्या नावांचा त्यात समावेश असल्याची माहिती उघडकीस आली. विशेष बाब म्हणजे यातील काही व्यक्तींचा मृत्यूही झाला होता. तर सनदी अधिकारी आर. ए. राजीव यांच्या नावाचाही यात समावेश होता. यात आमदार किसन कथोरे मुख्य प्रवर्तक असल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: November 30, 2019 11:15 AM
Exit mobile version