विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार घोषणेवर नाना पटोलेंची महत्वाची माहिती

विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार घोषणेवर नाना पटोलेंची महत्वाची माहिती

राज्यात हिवाळी अधिवेशनाला तीन दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अद्यापही झालेली नाहीये. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना काल पत्र पाठवण्यात आलं आहे. परंतु राज्यपालांकडून कुठलंही पत्र आलेलं नाहीये. मात्र, उद्या संध्याकाळपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना काल पत्र पाठवण्यात आलं होतं. परंतु राज्यपालांकडून कुठलंही पत्र आलेलं नाहीये. त्यामुळे सोमवारी निवडणुकीचा कार्यक्रम विधानमंडळात घेण्याचं ठरलं आहे. तसेच या सर्व परिस्थितीवर हाय कमांडचं लक्ष आहे. त्यामुळे पत्र आल्यास उद्या संध्याकाळपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.

काँग्रेसमधल्या चार नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे आणि के.सी.पाडवी यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. परंतु विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव अग्रस्थानी असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. दरम्यान, पत्रकारांनी यावर प्रश्न विचारला असता, पक्ष जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिली होती. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचा उमदेवार देणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. परंतु विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून नियमावलीत बदल करण्यात आला आहे. यंदाची निवडणूक प्रत्यक्ष मतदानाऐवजी आवाजी मतदानाने होणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार कोण होणार?, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे.


हेही वाचा : नितेश राणेंची कणकवली पोलीस ठाण्यात पाऊण तास


 

First Published on: December 25, 2021 6:00 PM
Exit mobile version