फोन टॅपिंगप्रकरणी नाना पटोलेंचा IPS अधिकारी रश्मी शुक्लांविरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा

फोन टॅपिंगप्रकरणी नाना पटोलेंचा IPS अधिकारी रश्मी शुक्लांविरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा

मुंबईः राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलाय. नाना पटोले यांनी अधिवक्ता सतीश उके यांच्यामार्फत नागपूरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल केला. पटोले यांची बाजू ऐकून न्यायालयाने केंद्रीय गृह विभागाच्या सचिव रश्मी शुक्ला, राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त सचिव, नागपूर आणि पुणे शहर पोलीस आयुक्त आणि पुणे गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी वैशाली चांदगुडे यांना समन्स बजावले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 12 एप्रिल रोजी ठेवली आहे.

शुक्ला यांच्यावर 2017-18 मध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यावेळच्या विरोधी पक्षनेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप आहे. फोन टॅपिंगसाठी त्यांनी राजकारण्यांची नावे बदलून प्रस्ताव मंजूर करून घेतल्याचाही ठपका ठेवण्यात आलाय. नाना पटोले यांना अमजद खान नावाच्या ड्रग्ज तस्कराने नाव देत त्यांचा फोनही टॅप केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विधानसभेने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली. शुक्लाविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये शुक्ला यांनी लोकप्रतिनिधींची स्वच्छ प्रतिमा डागाळल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात काय घडले?

महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 2 एफआयआर नोंदवण्यात आले होते. पहिला एफआयआर मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, तर दुसरी तक्रार दक्षिण मुंबईतील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) प्रमुख असताना फोन टॅपिंग झाल्याचा आरोप आहे. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते.

खासगी एजन्सीकडून फोन टॅप केल्याचा आरोप

यापूर्वी काँग्रेसने भाजप आणि राज्य प्रशासनावर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले होते की, भाजपला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे फोन खासगी एजन्सीकडून टॅप केले जात आहेत. चोडणकर म्हणाले होते की, कर्नाटकात सरकार पाडल्यानंतर त्यात हेरगिरी असल्याचे आढळून आले. 10 मार्च रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी अपक्ष उमेदवार आणि भाजपचे लोकही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या संपर्कात होते.


हेही वाचाः पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्त; अहवाल सादर करण्याचे आदेश

First Published on: March 24, 2022 12:11 PM
Exit mobile version