Mlc Election 2021 : प्रज्ञा सातवांच्या बिनविरोध निवडीसाठी फडणवीसांचीही भेट घेणार- नाना पटोले

Mlc Election 2021 : प्रज्ञा सातवांच्या बिनविरोध निवडीसाठी फडणवीसांचीही भेट घेणार- नाना पटोले

महाराष्ट्रात जेव्हा पोटनिवडणूक लागते तेव्हा नेहमीच बिनविरोध निवडणूकीची परंपरा राज्यात आहे. त्यामुळे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतरच्या प्रज्ञा सातव यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. जेव्हा जेव्हा पोटनिवडणूक होते , तेव्हा ही निवडणूक बिनविरोध होते, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळेच प्रज्ञा सातव यांच्या निवडणूकीसाठी फडणवीसांची भेट घेऊन ही निवडणूक बिनविरोध करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. भाजपकडून संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पण त्याठिकाणी बिनविरोध निवडणूकीसाठी भाजपचे मन वळवणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. राजकीय हेवेदावे विसरून या निवडणूकीसाठी भाजपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची विनंती करणार असल्याचेही पटोलेंनी सांगितले.

काय म्हणाल्या प्रज्ञा सातव ?

आज सर्वात जास्त राजीवजींची आठवण येत आहे. आज राजीवजी जाऊन सहा महिने झाले आहेत. पक्षाकडून विधान परिषदेसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि कॉंग्रेस पक्षाचे नेत्यांचे आभार मानले. माझ्या पाठीशी कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेते आहेत. कॉंग्रेसमधील जेष्ठ नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण माझ्या पाठीशी उभे आहेत. आज अर्ज भरताना राजीव सातव यांची खूप आठवण आली. त्यांच्या आशीर्वादानेच आणि स्मरण करत आज मी पक्षाने दिलेल्या जबाबदारीला सामोरे जात आहे. आज राजीवजी नसले तरीही कार्यकर्ते हे भावासारखे माझ्या पाठीशी आहेत, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी दिली. विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी त्या मुंबईत आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

आज राजीव सातव यांना मानणारे माझे भाऊ ६०० किलोमीटरचा पल्ला गाठत मुंबईत अर्ज दाखल करण्यासाठी हजर झाले आहेत. हे सगळे भावासारखेच कार्यकर्ते माझ्या पाठीशी मला बळ देणारे असे आहेत. माझ्या पाठीशी खंबीरपणे वर्षाताई गायकवाड आहेत. या सगळ्या मोठ्या अनुभवी मंडळींनी आणि महाविकास आघाडी सरकारने माझ्यावर विश्वास दाखवला आहे, असेही त्यांनी सांगितले. हिंगोलीत राजीव सातव यांना मानणारे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने मला पाठिंबा देण्यासाठी हजर झाल्याचेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – MLC election: विधानपरिषदेसाठी भाजपच्या केणेकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल, प्रज्ञा सातवांची बिनविरोध निवड होणार?

First Published on: November 16, 2021 3:08 PM
Exit mobile version