निष्क्रीय मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडतच नाही; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

निष्क्रीय मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडतच नाही; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला. राज्यातील मुख्यमंत्री निष्क्रीय मुख्यमंत्री आहेत, असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला. मंत्रालयात गेले काही महिने मुख्यमंत्री नाहीत, तर आपण राज्यात सरकार आहे असं समजायचं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री बाहेरच येत नाहीत, ते मुख्यमंत्री मातोश्रीपुरतेच आहेत, असा टोला राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री मातोश्रीपुरतेच आहेत. ते बाहेर येतच नाही. बाहेर आले तर काही बोलत नाहीत. जनतेचे प्रश्न हाताळत नाहीत. मुख्यमंत्री लॉकडाऊनशिवाय काही बोलत नाहीत. कोरोनाच्या प्रश्नावर बैठका होत नाहीत. कोरोना संकटावर हे सरकार गंभीर आहे का? असा सवालही त्यांनी केला. बदल्या रद्द केल्यांनतर तातडीने बैठका होतात. मग कोरोनासारख्या प्रश्नावर बैठका का होत नाहीत. आज अधिकाऱ्यांचं राज्य आहे, उद्धव ठाकरेंचं राज्य नाही आहे. उद्धव ठाकरेंनी चार महिन्यात राज्याला किमान १० वर्षे मागे घेऊन जायचं काम केलं आहे. कोणत्याही बाबतीत निर्णय नाही. काही बोलत नाही. पंढरपुरला गेले तर साधा प्रसाद घेत नाहीत. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री सापडणार नाही, असं राणे म्हणाले.

आज उपसामारीची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. होमगार्डचे पगार नाहीत. डॉक्टर, परिचारीकांचे पगार नाहीत. आज सगळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. याचं मुख्यमंत्र्यांना काही पडलेलं नाही. मुख्यमंत्री डोळे मिटून फक्त लॉकडाऊन करा एवढंच बोलतात. लॉकडाऊन करा पण किती दिवस? प्रत्येक महिन्यात नवे प्रश्न निर्माण होणार आहेत. त्याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. बोगस बीयाणं दिलं गेलं. पण पाहतंय कोण त्यांच्याकडे? कोकणात वादळ आलं. वादळानंतर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गाला मदत जाहीर केली. अद्याप एक रुपया मिळालेला नाही, असा आरोप राणेंनी केला. दरवर्षी जिल्हा नियोजनाचा फंड जातो. मात्र, एकही रुपया देण्यात आलेला नाही. वादळामुळे नुकसान झालेल्या भागात पंचमाने देखील झाले नाहीत. “जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नाही, तो मुख्यमंत्री कशाला हवा?” असा सवालही त्यांनी केला. मंत्रालयात बसून प्रश्न, प्रशासन हाताळत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा? हा मुख्यमंत्री निष्क्रीय आहे. हा मुख्यमंत्री प्रशासन चालवू शकत नाही,” असा हल्लाबोल राणेंनी केला. हे सरकार राज्यासाठी योग्य नाही, असंही राणे म्हणाले.

 

First Published on: July 6, 2020 4:31 PM
Exit mobile version