सिडकोत मुकणेबरोबर गंगापूरमधूनही पाणी

सिडकोत मुकणेबरोबर गंगापूरमधूनही पाणी

संपूर्ण सिडको परिसराला मुकणे धरणातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा; मात्र याच मुकणे पाईपलाईनमधून पंचवटी आणि नाशिकरोडलाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सिडकोत कमी दाबाने पाणी येते. यावर तोडगा म्हणून सिडकोला मुकणेसह गंगापूर धरणातूनही पाणीपुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. ८) झालेल्या बैठकीत जाहीर केला. तसेच पाथर्डी येथील जलकुंभातून इंदिरानगर आणि सिडको विभागासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे आदेश महापौरांनी दिले.

महापौरांच्या रामायण निवासस्थानी सिडकोतील सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक महापौरांनी बोलवली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी झालेल्या महासभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सिडकोच्या काही प्रभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यास पाणी पुरवठा अभियंता रविंद्र धारणकर आणि गोकूळ पगारे यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचा आरोप सिडकोतील नगरसेवकांनी महासभेत केला होता. या नगरसेवकांनी ऑनलाईन महासभा असतानाही महापौरांच्या पीठासनासमोर जाऊन रोष व्यक्त केला होता. त्यामुळे महापौरांनी मंगळवारी तातडीने या विषयावर बैठक बोलवली. मुकणे योजनेतून सिडकोच नव्हे तर पंचवटी आणि नाशिकरोडपर्यंत पाणी पुरवठा केला जात असल्याने सिडकोतील पाणी पुरवठ्यावर प्रतिकुल परिणाम झाल्याचा निष्कर्ष यावेळी झालेल्या चर्चेत काढण्यात आला.

सिडको भागाला परिसराला मुकणेबरोबरच काही प्रमाणात धरणातूनही पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापौरांनी दिला. यावेळी सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, पूर्व विभागाचे सभापती अ‍ॅड. श्याम बडोदे, सिडकोचे सभापदी चंद्रकांत खाडे, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, रत्नमाला राणे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, डी. जी. सूर्यवंशी, किरण गामणे, मुकेश शहाणे, छाया देवांग, प्रतिभा पवार, पुष्पा आव्हाड, सुदाम डेमसे, दीपक दातीर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, अविनाश धनाईत, रविंद्र धारणकर, ललित भावसार आदी उपस्थित होते.

First Published on: December 8, 2020 7:04 PM
Exit mobile version