बाळासाहेब थोरातांच्या घरी शुभांगी पाटील गेल्या, पण आल्या पावली परतल्या; नेमके काय घडलं?

बाळासाहेब थोरातांच्या घरी शुभांगी पाटील गेल्या, पण आल्या पावली परतल्या; नेमके काय घडलं?

नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आज संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र, बाळासाहेब थोरात यांचे कुटुंबीय सध्या मुंबईत असल्याने त्यांना प्रवेशद्वारातूनच परत जावे लागले. बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना घरी कोणीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे शुभांगी पाटील यांना परत जावे लागले. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (nashik graduate constituency candidate shubhangi patil denied entry to balasaheb thorat house in sangamner)

नेमके काय घडलं?

शुभांगी पाटील काही कार्यकर्त्यांसह थोरात यांच्या निवासस्थानी आल्या. तेव्हा मुख्य प्रवेशद्वार बंद होते. त्यांनी फटीतून आतील कर्मचाऱ्याशी संवाद साधला. आपला परिचय करून दिला. थोरात किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भेटायचे असल्याचे सांगितले. मात्र, आतील कर्मचाऱ्याने घरी कोणीच नसून सर्वजण मुंबईला गेल्याचे सांगितले. त्यानंतर शुभांगी पाटील यांनी कोणाला तरी फोन केला. पलीकडूनही घरी कोणीच नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शुभांगी पाटील यांना आल्या पावली परत जावे लागले.

या सगळ्या प्रकारानंतर बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले नसेल आणि थोरात कुटुंबीय मुंबईत असल्याने पाटील यांना तसे सांगून परत पाठविले, असेल असे थोरात यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातून शुभांगी पाटील यांच्या विरोधात सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत यांनी पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून पक्षाने त्यांना निलंबित केले आहे.

बाळासाहेब थोरातांवर मुंबईत उपचार

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला गेले असता ते घसरून पडल्याने त्यांचा खांदा दुखवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहे. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याने त्यानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे.


हेही वाचा – शिवसेना पक्षचिन्हासह पक्षप्रमुखपदही अधांतरी, निवडणूक आयोगासमोर ३० जानेवारीला सुनावणी

First Published on: January 20, 2023 10:58 PM
Exit mobile version