नाशिक पदवीधर मतदारसंघात एका रात्रीत चित्र बदलू शकतो, भाजपाचा दावा

नाशिक पदवीधर मतदारसंघात एका रात्रीत चित्र बदलू शकतो, भाजपाचा दावा

नाशिक – नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने अद्यापही कोणत्याच उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात नेमकं काय घडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. एका रात्रीत नाशिक मतदारसंघाचे चित्र बदलण्याची क्षमता भाजपामध्ये आहे, असं सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.

सुजय विखे पाटील म्हणाले की, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे याबाबत योग्यवेळी निर्णय घेतील. निवडणूक जवळ आली असली तरीही एका रात्रीत निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यामध्ये आहे. ज्या माणसाचं नाव देवेंद्र फडणवीस घेतील, त्याला आम्ही पाठिंबा देऊ.

हेही वाचा ‘मविआ’चा भाग व्हायचे असेल तर, प्रमुख स्तंभांवर बोलू नये; राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

नाशिक पदवीधर मतदारसंघातून मविआने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्या शिवसेनेच्या स्वीकृत उमेदवार असतील. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे संगमनेर सोडून जिल्ह्यात काँग्रेस कुठेच जिवंत नसल्याचाही दावा विखे पाटील यांनी केला. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. राहुल गांधी जेवढा भारत जोडोचा प्रयत्न करतील तेवढीच काँग्रेस छोडो सुरू राहील असंही सुजय विखे पाटील म्हणाले.

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. यावरही सुजय विखे पाटील यांनी टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष असूनसुद्धा जयंत पाटील असं म्हणत आहेत याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. त्यांना दुःख हे नाही की अजित पवार तेव्हा का नाही गेले. त्यामुळे त्यांना काय फार आपण मनावर घेऊ नये.

First Published on: January 27, 2023 8:10 AM
Exit mobile version