दादरनंतर आता शिंदे गटाचा नाशिकमध्ये हवेत गोळीबार

दादरनंतर आता शिंदे गटाचा नाशिकमध्ये हवेत गोळीबार

नाशिकः देवळाली येथे शिंदे गटाचे पदाधिकारी सुर्यकांत लवटे यांचा मुलगा स्वप्निलने हवेत गोळीबार केल्याची घटना गुरुवारी घडली. ठाकरे व शिंदे गटात बाचाबाची झाली. त्यावेळी लवटे याने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केला. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण होते.

शिवजयंतीचा अध्यक्ष कोण होणार यावरुन हा वाद झाला. शिवजयंतीसाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अध्यक्षपदाची चर्चा सुरु होती. त्याचवेळी ठाकरे व शिंदे गटात वाद झाला. लवटे यांनी बंदूक काढत हवेत गोळीबार केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दुकानदारांनी भीतीने दुकाने बंद केली. तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्याच महिन्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा झाला. या दौऱ्यानंतर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुर्यकांत लवटे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. खासदार राऊत यांनी दोनवेळा नाशिक दौरा करूनही ठाकरे गटाला तेथे गळती लागली. याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

त्यानंतर येथे ठाकरे व शिंदे गट असे शीत युद्ध सुरुच होते. शिवजयंतीच्या सर्वपक्षीय बैठकीत या दोन्ही गटातील वाद उफाळून आला. हा वाद होताच लवटेने थेट बंदूक काढत हवेतच गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्वप्निल लवटेला ताब्यात घेतले आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानदारांनी दुकाने बंद केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी येथे फौजफाटा तैनात केला आहे. स्वप्निल हा शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या आहे.

गेल्या वर्षी मुंबईतील दादर, प्रभादेवी येथे ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत वाद झाला होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्याविरोधात याचा गुन्हाही नोंदवण्यात आला. आमदार सरवणकर यांनी हा आरोप फेटाळला. हा गोळीबार आमदार सरवणकर यांच्याच बंदुकीतून झाला आहे की नाही याची चाचणी करण्यात आली. आमदार सरवणकर यांच्याच बंदुकीतून हा गोळीबार झाल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

 

First Published on: January 20, 2023 9:06 AM
Exit mobile version