ही धडाकेबाज महिला चालविते ‘स्कूल बस’; पालकांचाही तिच्यावरच विश्वास

ही धडाकेबाज महिला चालविते ‘स्कूल बस’; पालकांचाही तिच्यावरच विश्वास

शालेय मुलांची टेंपो ट्रॅव्हलर बस एक स्त्री चालवते? पाहताना आश्चर्य वाटतं ना! पण हे खरे आहे. कौटुंबिक आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी नाशिक येथील कल्पना पवार यांनी टेंपो ट्रॅव्हलर चालक हा चाकोरीबाहेरचा व्यवसाय निवडला आहे. स्वतःची स्कूलबस चालवून मुलांना शाळेत नेआण करणं आव्हानात्मक असलं तरी अवघड नक्कीच नव्हतं. त्यासाठी कल्पनाताईंनी त्यासाठी कर्ज काढून टेंपो ट्रॅव्हलर विकत घेतला आणि स्कूलबसच्या ड्रायव्हरही झाल्या.

दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या कल्पना पवार लग्नानंतर नाशिकच्या म्हसरूळ येथे राहतात. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळं सुरुवातीला मिळतील ती धुणंभांड्याची कामं केली. पण काही कटू अनुभवांमुळे ती कामं करायची नाहीत, असा निर्णय त्यांनी घेतला. कल्पनाताईंचे पती राज्य परिवहन मंडळात चालक असल्यामुळे गाडी शिकण्याची, ती चालवण्याची त्यांना आवड होतीच; पण त्याला व्यवसायाचं रूप द्यायचं ठरलं ते पेट्रोल पंपावर काम करताना.

अशी मिळाली प्रेरणा

तीनसाडेतीन वर्षं पेट्रोल पंपावरील कामाचा अनुभव घेताना कल्पनाताईंना जाणवलं, की या क्षेत्रात, तसंच वाहन चालक म्हणून स्त्रिया फारसं काम करताना दिसत नाहीत. त्यातून विचारप्रक्रिया सुरू झाली, पुरुष कोणत्याही क्षेत्रात काम करू शकतात; मग स्त्रियांनाच मर्यादा का? आर्थिक मागास गटातील कमी शिकलेल्या स्त्रियांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घरकामगारच का व्हायचं? दुसरीही आवडती कामं त्या निवडू शकतात. या विचारांना दिशा मिळाली ती पेट्रोल पंपवर मुंबईहून स्कॉर्पिओ घेऊन येणाऱ्या एका स्त्रीकडून. ही स्त्री पेट्रोलपंपावर आल्यावर कल्पनाताईंना नेहमी भेटायची. तेव्हा कल्पनाताईंच्या मनात चारचाकी गाडी शिकण्याचे विचार आले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या यजमानांकडूनच गाडी शिकल्या. त्या म्हणतात, ‘‘पेट्रोल पंपवर नोकरी करायची तेव्हा तिथं मी एकटीच स्त्री होते. कमी पगार होता. स्त्रियांच्या दृष्टीनं ते धोकादायकच काम आहे. त्यामुळे मी तिथली नोकरी सोडून आवडत्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं.’’

स्वप्नांना शासनाच्या योजनेचाही हातभार

पतीकडून चारचाकी शिकल्यावर कल्पनाताईंनी सेकंड हँड मारुती व्हॅन गाडी घेतली. आपल्या तिसरी आणि पहिलीतल्या छोट्या मुलांना त्या या गाडीनं तीन किलोमीटर अंतरावरच्या मेरी परिसरातल्या शाळेत सोडू लागल्या. हळूहळू गाडीमधली मुलांची संख्या वाढू लागली. त्यानंतर म्हणजे गेली १० ते १२ वर्षं त्या गाडीने मुलांची शाळेतून ने आण करत आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ साली त्यांनी व्यवसायात नवीन झेप घ्यायची ठरवली. मोठा चौदा सीटर टेंपो ट्रॅव्हलर विकत घेऊन मोठ्या शाळेशी ‘टायअप’ करायचे व शालेय मुलांची वाहतूक करण्याचा धाडसी निर्णय घेतला. टेंपो ट्रॅव्हलर विकत घेण्यासाठी साडेआठ लाख रुपये कुठून आणणार? हा प्रश्न होताच. पण हा प्रश्न चुटकीसरशी सुटला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेमुळे. वैयक्तिक कर्ज योजनेअंतर्गत त्यांनी येथील नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांना ट्रॅव्हलरसाठी ८ लाख ३० हजार रुपयांच्या कर्ज मिळाले आणि गाडी दारापुढे उभी राहिली. या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्यांना व्याजमाफी असून व्याज परतावाही मिळत असल्याने त्यांना वाहन घेणे अगदी सुलभ झाले.

कविताताई सध्या सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेचारपर्यंत चार शिफ्टमध्ये त्या येथील इंग्रजी शाळेसाठी सुमारे शंभर मुलांना नेआण करण्याचं काम करतात. बिनव्याजी कर्ज योजनेमुळे केवळ मुद्दल फेड करून करत असलेल्या मेहनतीचा वाटा आपल्या पदरात पडेल, असं त्या सांगतात. शालेय मुलांची वाहतूक करण्याच्या क्षेत्रात १० ते १२ वर्षांपूर्वी महिला नव्हत्या. त्यामुळे एक बाई ही जबाबदारी पार पाडू शकेल का, अशी शंका पालकांच्या मनात होती; पण माझं चांगलं काम त्यांच्या लक्षात आलं, तसंच माझ्याकडे एक स्त्री म्हणून असलेलं जबाबदारीचं भानही त्यांना समजलं. आता पालक आणि शाळा माझ्याकडे अभिमानानं व्यक्त होतात, असं कल्पनाताई आवर्जून सांगतात.

First Published on: June 8, 2019 1:09 PM
Exit mobile version