जिल्हा परिषद शाळांतील ७१ हजार विद्यार्थी गणवेशाविना

जिल्हा परिषद शाळांतील ७१ हजार विद्यार्थी गणवेशाविना

प्रातिनिधीक फोटो

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी अद्याप विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पोहोचलेले नाहीत. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी गणेशाविना दिसू नयेत म्हणून शिक्षण विभागाने त्वरित गणवेश वाटपाचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. जुलैअखेर एक लाख ६७ हजार ६५४ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले असून, ७१ हजार ३४६ गणवेशाची प्रतीक्षा लागून आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशासाठी 600 रुपये देण्याचा निर्णय घेतला. शाळा व्यवस्थापन समितीने शालेय पातळीवर गणवेशाची खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, शिक्षण विभागाने हा निर्णय उशिराने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळवल्याने जूनच्या अखेर आठवडयापासून गणवेश खरेदीचे पैसे शाळांना वर्ग करण्यास सुरुवात झाली. महिनाभरात ७५ टक्के विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळू शकले आहेत. जिल्हा परिषदेच्या ३ हजार ३०० शाळांमध्ये एकूण दोन लाख, ३९ हजार विद्यार्थी असून, या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे शाळा पातळीवर वर्ग करून गणवेष खरेदीसाठी दरपत्रके, कपड्यांचे मापे घेण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे जुलैअखेर एक लाख, ६७ लाख, ६५४ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. गेल्यावर्षी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश न देता, गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले होते. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास शून्य रकमेवर बँकेत खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र, खाते उघडण्यात बँकांनी नकारघंटा दर्शवल्याने विद्यार्थ्यांना गणवेशासाठी वेळात पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी आल्या. यात अनेक विद्यार्थ्यांनी गणवेशासाठी मिळालेले पैसे खर्च करून टाकल्याने गणवेश खरेदी झालीच नसल्याचे दिसून आले. यावरून मोठे वादंगही झाले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने हा निर्णय रद्द केला आहे.

First Published on: August 3, 2019 12:01 AM
Exit mobile version