आंदोलनामुळे दिनकर पाटील ‘एकाकी’

आंदोलनामुळे दिनकर पाटील ‘एकाकी’

आंदोलनामुळे दिनकर पाटील ‘एकाकी’

‘पार्टी विथ डिफ्रन्स’ची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यास निघालेल्या भारतीय जनता पक्षाला महापालिकेतील सभागृह नेता दिनकर पाटील यांनीच घरचा आहेर दिला आहे. त्यांनी महासभेच्या सभागृहात थेट ठिय्या मांडत पदाधिकार्‍यांना आव्हान दिले. परिणामी आता दिनकर पाटील यांचे सभागृहनेता पद धोक्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे पक्षातील वरिष्ठांनी विशिष्ट नगरसेवकांना संपर्क साधत पाटील यांच्या आंदोलनात सहभागी न होण्याच्या सूचना केल्या आहेत. पक्षाच्या शिस्तीवर भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने वारंवार चर्चा होते. किंबहुना भाजपसारखा शिस्तबध्द पक्षच नाही अशा वल्गना पदाधिकार्‍यांकडून केल्या जातात. असे असताना महापालिकेत मात्र या पक्षाचा कशातच पायपूस नसल्याचे निदर्शनास येते. सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या आंदोलनामुळे पदाधिकार्‍यांची कुचकाम भूमिका जनतेसमोर आली आहे. महापौर आणि सभागृह नेत्यांची ‘युती’ महापालिकेत सर्वश्रूत आहे. वेगवेगळे प्रस्ताव आणि त्यांचे ठरावात रुपांतर करण्याच्या बाबतीत ही युती कालपर्यंत सक्रीय होती. मात्र महासभेत सभागृह नेत्यांनी जो ‘राडा’ केला, तेव्हापासून महापौरांनी सभागृह नेत्याची साथ सोडल्याचे बोलले जात आहे. अर्थात अशा प्रकारची भूमिका पाटील यांनी प्रथमच घेतली असे नाही. मात्र ज्यावेळी पाटील यांनी अशा प्रकारची भूमिका घेत होते त्यावेळी त्यांना छुप्या पध्दतीने साथ देणारे आता एकाएकी का दूरावले याचाही ‘अर्थ’ अनेकांना अद्याप समजलेला नाही. दुसरीकडे ‘संकट हीच संधी’ची प्रचिती देत आमदारांनीही पाटील यांच्या विरोधात मोट बांधल्याचे बोलले जात आहे. अर्थात त्यास पक्षातीलच वरिष्ठांची विशेषत: पालकमंत्र्यांची साथ असल्याचे सांगितले जाते. इतकेच नाही तर आंदोलनवेळी पाटील यांच्यासमवेत ज्या नगरसेवकांचे फोटो दिसले ते पध्दतशीरपणे वरिष्ठांपर्यंत पोहचवण्यात आलेत. त्यामुळे संबंधित नगरसेवकांना संपर्क साधत ‘पाटील यांच्याबरोबर पुन्हा दिसलात तर याद राखा’, असाच दम भरला गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता पक्षीय पातळीवर पाटील यांना पूर्णत: घेरल्याचे चित्र आहे. त्यातून त्यांचे सभागृहनेतेपदही हातचे जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकेच नाही तर त्यांच्या जागेवर दिनकर आढाव यांची वर्णी लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील स्थानिक पातळीवरील या हालचालींनी पक्ष ढवळून निघाला आहे. दुसरीकडे पाटील यांच्या विधानसभेच्या उमेदवारीवरही पक्षाने फुली मारल्याचे काही पदाधिकार्‍यांनी सांगितले. काही दिवसांपुर्वीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये येऊन पाटील यांची खासगीत भेट घेतली होती. विशेष म्हणजे या भेटीविषयी शहराध्यक्षही अनभिज्ञ होते. त्यामुळे या राजकीय डावात भाजपमधील पाटील समर्थक पदाधिकार्‍यांची सरशी होते की, पालकमंत्र्यांचा गट प्रबळ ठरतो बघणे आता औत्सूक्याचे ठरणार आहे.

First Published on: June 26, 2019 11:30 PM
Exit mobile version