गुजराती मतांसाठी भाजप, राष्ट्रवादीची रस्सीखेच

गुजराती मतांसाठी भाजप, राष्ट्रवादीची रस्सीखेच

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील पंचवटी परिसर, नाशिकरोड भागात मोठ्या प्रमाणावर गुजराती मतदारांची संख्या अधिक असल्याने या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपसहित राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने दोन दिवसात अनेक गुजराती नेते आणि आमदारांना प्रचारासाठी आणले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचीही सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने गुजराती समाजातील प्रतिष्ठीतांना बरोबर घेऊन प्रचार सुरु केला आहे. 

पूर्व मतदारसंघात विशेषत: पंचवटी परिसरात गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. बहुतांश गुजराती मते भाजपला मिळत असल्याने त्याचा फायदा निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना होत असत. आगामी निवडणुका लक्षात ठेवत लोकप्रतिनिधींकडून गुजराती समाजासाठी मोठी कामे केली जातात. या कामांमुळेच आमदार बाळासाहेब सानप यांचे गुजराती समाजाशी निकटचे संबंध झाले होते. मात्र सानप यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी यंदा राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली आहे. त्यामुळे गुजराती मते आपला पारंपारिक पक्ष सोडून राष्ट्रवादीला पसंती देतील का हे बघणे महत्वपूर्ण ठरणार आहे. दुसरीकडे भाजपकडून उमेदवारी मिळालेले अ‍ॅड. राहुल ढिकले यांना गुजराती मते किती प्रमाणात मिळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. अ‍ॅड. ढिकले हे पूर्वपारपासून पंचवटीतीलच रहिवासी असल्याने त्यांचेही गुजराती समाजाबरोबर चांगले संबंध आहे. गुजराती मते हातचे जाऊ नये म्हणून स्थानिक भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी प्रचारात आघाडी घेण्यासाठी शक्कल लढवत थेट गुजराथी आमदारांचा सहारा घेतला आहे. गेल्या शनिवारी एका  गुजराती आमदाराला प्रचारासाठी निमंत्रित करून एकाच दिवशी पूर्व विधानसभा मतदारसंघात गुजराती मतदारांच्या बारा ठिकाणी बैठका घेतल्या. तसेच गुजराती मतदारांचे मन वळविण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांना बोलवून सभा घ्यावी लागली. दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपच्या व्यापारी धोरणावर प्रहार करीत गुजराती मते कवेत घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

First Published on: October 17, 2019 9:00 AM
Exit mobile version