घरात राहुन निकाल कसा बनवायचा?

घरात राहुन निकाल कसा बनवायचा?

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द झालेल्या असल्या तरी प्रथम सत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना निकाल कळवण्याचे आदेश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी नुकतेच दिले आहेत. यावरुन शिक्षक व प्रशासन अधिकार्‍यांमध्ये बेबनाव सुरु झाला असून घरात बसून निकालपत्र कसे तयार करायचे, असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. तर आकारिक मूल्यमापनाचे सूत्र सांगत शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांना निकाल ऑनलाईन देण्याच्या सूचना केल्या आहेत. या दोघांच्या वादात विद्यार्थी विनाकारण भरडला जात असून सामोपचाराने योग्य तोडगा काढण्याची मागणी पालकांनी केली आहे.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्षातून दोन वेळा आकारिक मूल्यमापन करुन त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जातो. परंतु, यंदा करोनामुळे दुसर्‍या सत्रातील आकारिक मूल्यमापन चाचणी झालेली नाही. मग अशा परिस्थितीत निकाल कसा तयार करायचा? असाही प्रश्न काही शिक्षकांना पडला आहे. त्यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर यांनी तोडगा काढत आकारिक मूल्यमापनाचे सूत्र ठरवून दिले आहे. पहिली व दुसरीसाठी 70 गुण, तीसरी व चौथीसाठी 60 गुण, पाचवी व सहावीसाठी 50 गुण, सातवी व आठवीसाठी 40 गुणांचे मूल्यमापन करत श्रेणीसाठी या गुणांचे शंभर गुणांमध्ये रुपांतर करण्याचे आदेश दिले आहेत. या विद्यार्थ्यांना एसएमएस, फोनवर किंवा व्हॉट्सअपद्वारे हा निकाल कळवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मात्र, घरात बसून विद्यार्थ्यांचा निकाल कसा बनवणार असा प्रतिप्रश्न शिक्षकांनी उपस्थित करत निकालापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांचे सर्व माहिती शाळेत अडकली आहे. शाळेत जाण्यास जिल्हाधिकार्‍यांची परवानगी नाही. बरेच जिल्हे रेडझोनमध्ये असल्यामुळे बाहेर पडण्याची मुभाही मिळणार नाही. अशा परिस्थितीत शिक्षकांना शाळेत जाऊ देण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांनी प्रशासनाची परवानगी घेवून दिली आहे का? असे अनेक प्रश्न जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख, सुरेश शेलार, गुफरान अन्सारी, उपाध्यक्ष माणिक मढवई, राजेंद्र सावंत यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: May 4, 2020 8:38 PM
Exit mobile version