अंजनेरी गडावरील रस्त्यासाठी १५० गावे एकत्र

अंजनेरी गडावरील रस्त्यासाठी १५० गावे एकत्र

त्र्यंबकेश्वर – अंजनेरी गडाच्या माथ्यापर्यंत मुळेगावमार्गे १४ किलोमीटरचा पक्का रस्ता करण्याचा प्रस्तावास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या रस्त्यास स्थगिती दिल्याचे जाहीर केले. मात्र, अंजनेरी गड विकासासोबत येथील परिसर विकासाच्या दृष्टीने अंजनेरी गडावर जाण्यासाठी रस्ता होण्यासाठी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या तालुक्यातील १५० गावांमधील ग्रामस्थ अंजनेरी गडावर जाण्यासाठी रस्ता हवाच या मागणीसाठी मुळेगाव येथे एकत्र आले होते.

बैठकीला जय बाबाजी परिवाराचे महंत पिनाकेश्वर महाराज, शिवसेना नेते समाधान बोडके, सामाजिक कार्यकर्ते हिरामण भगत, माजी सभापती देवराम भस्मे, बाजार समितीचे उपसभापती रवींद्र भोये, सरपंच नामदेव सराई, सरपंच परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कोठुळे, पांडुरंग आचारी, नामदेव भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती. खासदार हेमंत गोडसे यांच्या अथक परिश्रमाने अंजेनेरी गडावर जाणाऱ्या रस्त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली, मात्र पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्यापर्यंत अर्धवट माहितीच्या आधारे केवळ एक बाजू मांडून काही व्यक्तींनी रस्त्याच्या कामात खोडा घातला. परंतु, आता अंजेनेरी गडावर रस्ता हवाच, असा ठराव १५० गावांनी केला. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन वास्तव मांडले जाईल. रस्त्या तयार करत असताना किती झाडे तोडली जातील, या ठिकाणी खरोखर किती वन्यजीव असून, रस्त्यामुळे पर्यावरणाचा खरोखर किती ऱ्हास होईल, याबाबत माहिती देणार असल्याचे शिवसेना नेते समाधान बोडके यांनी सांगितले.

जय बाबाजी परिवार व सरपंच परिषद करणार वृक्षारोपण

अंजेनेरी गडाच्या माथ्यापर्यंत मुळेगाव मार्गे होणार्या रस्त्यामध्ये ठराविकच झाडे असून आजच्या स्थितीत कच्चा रस्ता आहे,त्यामुळे रस्ता करत असताना ज्या संख्येत झाडे तोडली जाईल त्याच्या दहा पट झाडे हे जय बाबाजी परिवाराचे सेवक तसेच सरपंच परिषदेच्या वतीने विविध ठिकाणी लावणार असल्याचे जय बाबाजी परिवाराचे महंत पिनाकेश्वर महाराज व सरपंच परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कोठुळे यांनी यावेळी सांगितले.

हनुमान जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडावर जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे.रस्ता सुरु होण्याच्या मार्गावर असताना काही लोकांनी प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे, हे न पाहता विरोध केला आहे. प्रत्यक्षात रस्ता करत असताना किती झाले तोडली जाणार आहे.हे पाहणे गरजेचे आहे.कारण प्रस्तावित मार्गात झाडे फार थोडे आहे.वन्य जीवाच्या नावाने जि ओरड चालू आहे.प्रत्यक्षात ते वन्यजीव नामशेष झालेले आहे.विरोध करणार्यांनी गडाचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.प्रत्यक्षात असलेली परिस्थितीची कल्पना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याच्या पर्यंत पोहचवून रस्त्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचे पर्यंत केले जातील. – हिरामण भगत, सामाजिक कार्यकर्ते

First Published on: November 30, 2020 5:27 PM
Exit mobile version