सिन्नरला विषबाधेने १७ जनावरांचा मृत्यू

सिन्नरला विषबाधेने १७ जनावरांचा मृत्यू

प्रातिनिधीक फोटो.

सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी शिवारात ज्वारीची ताटे खाल्ल्याने झालेल्या विषबाधेने १३ गायींसह ४ म्हशींचा बळी घेतला. दुष्काळामुळे चारा व पाण्यासाठी जनावरांना घेऊन घरापासून दूर निघालेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिकदृष्ट्या या घटनेने मोठा धक्का बसला.

कोमलवाडी शिवारात रघुनाथ गवळी व त्यांचे काही सहकारी आपली सुमारे ९० जनावरे चरण्यासाठी घेऊन फिरस्तीवर निघालेली आहेत. शुक्रवारी, ३ मे रोजी गवळी यांनी त्यांच्या जनावरांना एका ज्वारीच्या शेतात सोडले होते. ज्वारी अलिकडेच कापलेली असली तरीही, अवकाळी पावसामुळे नवे अंकुर फुटलेले होते. कोवळ्या ज्वारीची ही ताटे जनावरांनी खाल्ल्यानंतर काही वेळातच जनावरांच्या तोंडाला फेस व चक्कर येऊ लागले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यापूर्वीच १२ गायी व ४ म्हशींचा मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान आणखी एक गाय दगावली. पथकाने विषबाधा झालेल्या ८ जनावरांवर तातडीने उपचार करत त्यांना जीवदान दिले.

कोवळ्या ज्वारीतच असतो विषारी घटक

ज्वारी पिकाचा कोवळा चारा खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होते. यालाच किरळ लागणे असेही म्हणतात. ज्वारीचे पीक एक ते दीड महिन्याचे असेपर्यंत ज्वारीच्या पानांसह खोडात हायड्रोसायनिक हे विषारी रसायन तयार होते. त्यातून जनावरांना विषबाधा होते. पशुपालकांनी विषबाधेची कोणतिही घटना घडल्यास, तातडीने पशुवैद्यकीय दवाखाना किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जलद उपचारांमुळे अनर्थ टळू शकतो.  डॉ. मिलिंद भणगे, पशुवैद्यकीय अधिकारी

First Published on: May 4, 2019 3:34 PM
Exit mobile version