नाशिक शहर ३ हजारपार

नाशिक शहर ३ हजारपार

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि.६)दिवसभरात 196 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 52, नाशिक शहर 132, मालेगाव 11 आणि जिल्ह्याबाहेरील एकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असतानाच सोमवारी पुन्हा दोन पोलीस उपनिरीक्षक कोरोनाबाधित आढळून आले. आत्तार्पंत शहरात पोलीस कर्मचारी बाधित आढळून आले होते पण सोमवारी अधिकारी बाधित आढळून आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दिवसभरात 7 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यात नाशिक शहर 5 आणि नाशिक ग्रामीणमधील 2 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 5 हजार 587 कोरोनाबाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात 3 हजार 74 रूग्ण आहेत.

जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. तरीही, जिल्ह्यातील रूग्णालये हाऊसफुल होवू लागली आहेत. सोमवारी दिवसभरात बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेले व कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आलेले 691 संशयित रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय 12, नाशिक महापालिका रूग्णालय 405, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 18, मालेगाव रूग्णालय 8, नाशिक ग्रामीण रूग्णालय 214 व गृह विलगीकरण 34 रूग्ण आहेत.
जिल्ह्यात आजवर २४ हजार ६११ संशयित रूग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. यात ५ हजार ५८७ रूग्ण बाधित आढळून आले असून ७२८ रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजवर 3 हजार 160 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 683, नाशिक शहर 1493, मालेगाव 892 आणि जिल्ह्याबाहेरील 92 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात २ हजार १४३ बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण 540, नाशिक शहर 1444, मालेगाव 129 आणि जिल्ह्याबाहेरील 30 रूग्णांचा समावेश आहे.

कोरोना वॉर्डवर राहणार सीसीटीव्ही ‘वॉच’
जिल्हा रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांची काळजी त्यांचेच नातेवाईक घेत असल्याचा व्हिडीओ रविवारी (दि.५) व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हा रूग्णालयातील कोरोना वॉर्डसह कोरोना कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिली आहे. तसेच कोरोना वॉर्ड व सेंटरमध्ये रूग्णांसाठी टीव्ही व कॉलिंग सुविधा सुरु केली जाणार आहे.

नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-5587 (मृत-284)
नाशिक ग्रामीण-1281 (मृत-58)
नाशिक शहर-3074 (मृत-137)
मालेगाव शहर-1097 (मृत-76)
जिल्ह्याबाहेरील-135 (मृत-13)

First Published on: July 6, 2020 8:12 PM
Exit mobile version