मालेगावला कोरोनाचे पुन्हा २ बळी; प्रतिबंधित क्षेत्र वाढवले

मालेगावला कोरोनाचे पुन्हा २ बळी; प्रतिबंधित क्षेत्र वाढवले

मालेगाव शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, आज पुन्हा एका महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे चिंता वाढली आहे. मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा (६४) आज मृत्यू झाला. तर जीवन रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या ५५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचाही आज मृत्यू झाला. आता मालेगावमधील मृतांचा आकडा ८ वर पोहोचला आहे.

सामान्य रुग्णालयात मृत्यू पावलेली महिला शहरातील कुंभारवाडा भागात रहात होती. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या महिलेचा तीन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित अहवाल बाधित आला होता. संपूर्ण मृतदेहाचे निर्जंतुकीकरण पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला.

दुसरी घटना ५५ वर्षीय एका व्यक्तीचा आज दुपारी जीवन रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाचाही कोरोना बाधित अहवाल सिद्ध झाला होता. ही व्यक्ती शहरातील मुस्लीमनगर भागातील रहिवाशी असल्याचे समजते.

एकट्या मालेगाव शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८५ वर पोहोचली असतानाच आता मृतांचा आकडा वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अटकाव क्षेत्र दहाने वाढले

सुरुवातील मालेगावमध्ये केवळ आठ क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. हा परिसर पूर्णपणे सील केला असतानाही आता या क्षेत्राबाहेर रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अटकाव म्हणजे प्रतिबंधित क्षेत्राची संख्या आता ८ वरून १८ वर पोहोचली आहे. यामध्ये शहरातील संगमेश्वर, मोतीबाग नाका, संजय गांधी नगर, जाधव नगर, मोमीन पुरा, दातार नगर, जुना आझाद नगर, जुना इस्लामपुरा, भायखळा झोपडपट्टी या भागाचा समावेश आहे.यामुळे प्रशासकी यंत्रणेच्या सोबतच आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे.

First Published on: April 20, 2020 3:43 PM
Exit mobile version