मालेगावी अ‍ॅपे रिक्षा उलटल्याने २० जखमी

मालेगावी अ‍ॅपे रिक्षा उलटल्याने २० जखमी

मालेगावी अ‍ॅपे रिक्षा उलटल्याने २० जखमी

मालेगाव तालुक्यातील मोरदर येथे मजूर घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अ‍ॅपे रिक्षा उलटल्याने २० मजूर जखमी झाले. दरम्यान, येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने जखमींना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागले. यावेळी गंभीर जखमींना तातडीने मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात केले दाखल केले.

शुक्रवार (१२ एप्रिल) तालुक्यातील निमशेवडी येथील मजूर मोलमजुरीसाठी खाकुर्डी येथे कांदा काढणीसाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर सायंकाळी परतीच्या मार्गावर असताना मोरदरजवळ अ‍ॅपे रिक्षा (एमएच-४१-एजी-२७२२) यावरील चालक अजय भगवान मासुळ (वय १९) याचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. वाहनात २० मजूर प्रवास करत होते. चालकाने मद्यप्राशन केले असल्याची चर्चा होती. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा मोहीते गैरहजर असल्याने काही जखमींना खासगी रूग्णालयात दाखल केले. मोहिते या मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे जखमींच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. जिल्हा वैद्यकीय अधिकारी डेकाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ दखल घेत मालेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख व भाऊसाहेब खोत यांना वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून जखमींवर उपचार सुरू केले आहेत.

नवरदेवाच्या वाहनाला अपघात

याचदरम्यान एका नुकतेच लग्न झालेल्या नवदांपत्य देवस्थानाला भेट देऊन येत असताना खाकुर्डीजवळ अ‍ॅपे रिक्षाचा अपघात झाला. यात नवरदेव नववधू जखमी झाले. यांना वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. मात्र, संबंधित वैद्यकीय आधिकारी उपस्थित नसल्याने मालेगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधित वैद्यकीय आधिका-यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केला आहे.

अधिकार्‍याची चौकशी होणार

जखमी रुग्णांवर उपचारसाठी सुचना दिल्या असून संबंधित वैद्यकीय अधिकार्‍याची चौकशी केली जाईल. वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य वैद्यकीय आधिकार्‍यांना पाठवले आहे. – डॉ. शैलेश निकम, तालुका वैद्यकीय आधिकारी, मालेगाव.

First Published on: April 13, 2019 10:00 PM
Exit mobile version