जिल्ह्यातील २,७३० बालके कुपोषित

जिल्ह्यातील २,७३० बालके कुपोषित

राज्यातील बालमृत्यूंचं प्रमाण घटलं

नाशिक जिल्ह्यातील वाढत्या कुपोषित बालकांचे प्रमाण रोखण्यात महिला व बालकल्याण विभागाला यश आल्याचे दिसून येत असले तरी मार्च २०१९ अखेर २ हजार ७३० बालकांना कुपोषणाची लागण झाल्याचे दिसून येते. यातही तीव्र कुपोषित बालकांची संख्या ही ३५३ असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येते.

गेल्या वर्षी जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या वाढत्या संख्येवरून हा प्रश्न संपूर्ण राज्यात गाजला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते ह्यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेत याप्रश्नावर लक्ष केंद्रीत केल्यावर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा खरा आकडा सर्वांसमोर आला होता. त्यानंतर डॉ. गिते यांनी अवघ्या चार महिन्यातच आवश्यक सर्व त्या उपाययोजना आणि ग्रामबालविकास केंद्रे सुरू करत जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण ११ हजाराहून ४ हजारांवर आणले होते. त्यानंतर याबाबत महिला व बालविकास विभागामार्फेत सातत्याने याप्रश्नी काम सुरूच ठेवण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील बालकांचे वजन, उंची, दंडाचा घेर आदीची वेळोवेळी तपासणी होत गेली. मार्च अखेर झालेल्या बालकांच्या तपासणीत ग्रामीण भागातील ३ लाख २१ हजार २९ बालकांची वजनेही घेण्यात आली. यात २ लाख ८४ हजार ३२४ बालके ही सर्वसाधारण गटात होती. अवघी ९ टक्के बालकी ही कमी वजनाची आढळून आली.

First Published on: April 14, 2019 8:17 AM
Exit mobile version