मतदारयादीत फोटो नसलेली २८ हजार नावे डिलीट

मतदारयादीत फोटो नसलेली २८ हजार नावे डिलीट

जिल्ह्यात मतदार छायाचित्र पडताळणी मोहिमेअतंर्गत निवडणूक शाखेने छायाचित्र नसलेल्या २८ हजार ९१८ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत. या मोहिमेत विभागाने ९९.८८ टक्के काम पूर्ण केले असून अवघी ४५ मतदारांचे छायाचित्र गोळा करणे बाकी आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार निवडणूक शाखा जिल्ह्यात मतदार छायाचित्र पडताळणी करत आहे. जिल्ह्यातील ४५ लाख ६४ हजार १२९ मतदारांमधून यादीत छायाचित्र नसलेल्या आणि परजिल्हयात वास्तव्यास गेलेल्या ३५,३७१ मतदारांची नावे शोधून काढली. त्यासाठी मतदान केंद्र अधिकार्‍यांची (बीएलओ) मदत घेत संबंधित मतदारांशी संपर्क साधला असता त्यातील ६,४१० जणांनी त्यांची रंगीत छायाचित्रे प्रशासनाकडे जमा केली. प्रशासनाकडून ही छायाचित्रे मतदार यादीत संबंधित मतदारांच्या नावापुढे अपलोड केली जात आहेत. मात्र, २८ हजार ९१८ मतदारांशी संपर्क साधूनही त्यांनी छायाचित्र ऊपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे या मतदारांनी नावे यादीतून वगळली आहे. मालेगाव मध्य मतदारसंघातील सर्वाधिक ७६६१ मतदारांची नावे यादीतून वळगण्यात आली. त्याखालोखाल बागलाणमध्ये ६६०६, सिन्नरमध्ये ४२०९ तर देवळालीमधील २९०५ मतदारांचे छायाचित्र नसल्याने त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. प्रशासनाकडे सद्यस्थितीत छायाचित्र नसलेले अवघ्या ४३ मतदारांची नावे आहेत. यामध्ये एकट्या मालेगाव मध्य मतदारसंघातील ४१ जणांचा समावेश आहे. तर नाशिक पश्चिम व इगतपूरीतील प्रत्येकी एक मतदार आहे.

वगळलेले मतदार

नांदगाव १३७७, मालेगाव मध्य ७६६१, मालेगाव बाह्य १०९०, बागलाण ६६०६, कळवण १२६०, चांदवड ५२६, येवला ४७३, सिन्नर ४२०९, निफाड ००, दिंडोरी ४३१, नाशिक पूर्व ०१, नाशिक मध्य ०१, नाशिक पश्चिम २४१, देवळाली २९०५, इगतपुरी २१३७.

First Published on: July 14, 2021 11:15 PM
Exit mobile version