सिडकोत गावगुंडांचा धिंगाणा; मध्यरात्री सिगारेट न दिल्याने दुकानदारास मारहाण

सिडकोत गावगुंडांचा धिंगाणा; मध्यरात्री सिगारेट न दिल्याने दुकानदारास मारहाण

घरात झोपलेल्या दुकानदारास गुरुवारी (9) मध्यरात्री 3.30 वाजेदरम्यान गावगुंडांनी उठवत सिगारेट मागितली. सिगारेट संपल्याचे सांगितल्याने राग अनावर झालेल्या गावगुंडांनी त्यास बेदम मारहाण केली. ही घटना मंथन अपार्टमेंटसमोर, कामटवाडा येथे घडली. याप्रकरणी नाजीम शाहाबुद्दी खाटीक (38, रा. कामटवाडा) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. प्रशिक अडंगळे (23,रा. अंबड), राहुल शेवाळे (20, रा. सिडको) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तसेच, पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाससुद्धा अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खाटीक घरात झोपले होते. त्यांचे घराशेजारीच दुकान आहे. मध्यरात्री 3.30 वाजेदरम्यान तिघेजण त्यांच्या दरवाजाजवळ आले. त्यातील एकाने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. खाटीक यांनी दरवाजा उघडला असता तिघांनी त्यांच्याकडे सिगारेटची मागणी केली. दुकानातील सिगारेट संपल्या आहेत, तुम्ही दुकानात येवून बघा, असे त्यांनी तिघांना सांगितले. राग अनावर झालेल्या तिघांनी कोयता, लाकडी दांडके घेवून परिसरात दहशत निर्माण करत  खाटीक यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्या रिक्षा व दुचाकीची दांडक्याने तोडफोड केली. खाटीक यांचे भाऊ मध्यस्थी झाले असता सिगारेट न दिल्याने त्यास सोडणार नाही, त्याला संपल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

First Published on: April 10, 2020 1:06 PM
Exit mobile version