नाशकात उभारणार ३०३ फूट उंच ध्वजस्तंभ

नाशकात उभारणार ३०३ फूट उंच ध्वजस्तंभ

वाघा बॉर्डरनंतर देशात दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात उंच ३०३ फूटाचा ध्वजस्तंभ कोल्हापूर पोलीस उद्यानात उभारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर नाशिक पोलीस आयुक्तालय परिसरात ध्वजस्तंभ व थीम पार्क विकसित व्हावे, अशी मागणी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे केली. त्यास फरांदे यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत विकासनिधीतून याबाबत कामे करण्यास सहमती दर्शवली.

पोलीस आयुक्तालय परेड मैदानात शनिवारी आयुक्त नांगरे-पाटील, आमदार फरांदे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी नांगरे-पाटील व आमदार फरांदे यांच्यात पोलीस आयुक्तालय सुशोभीकरणासंदर्भात चर्चा झाली. कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानात ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ध्वजस्तंभावर ९० फूट लांब व ६० फुट रूंद असा ५ हजार ४०० चौरस फुटाचा राष्ट्रध्वज आहे. शहराच्या चोहोबाजूंनी हा राष्ट्रध्वज सहज दिसू शकेल, इतका उंच आहे. नाशिकमध्येही असाच ध्वजस्तंभ उभारल्यास तो नाशिककरांच्या गर्वाची बाब ठरेल, असे मत नांगरे-पाटील यांनी आमदार फरांदे यांच्याकडे व्यक्त केले. कोल्हापूर पोलीस उद्यानात रंगीबेरंगी फुलझाडे, विविध प्रकारची बहुपयोगी वृक्ष आहेत. असे उद्यान नाशिक पोलीस आयुक्तालय परिसरात उभारले जावे, याबाबतही पाटलांनी आमदार फरांदेकडे विचार मांडला.

नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब

कोल्हापूरच्या धर्तीवर नाशिक पोलीस आयुक्तालयात या सुविधांचा विचार झाल्यास नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब ठरेल. योग्य ठिकाणी सुशोभीकरणाचा विचार झाल्यास तो प्रेरणादायी ठरेल यातून कर्मचारी-अधिकार्‍यांना काम करण्यासही प्रोत्साहन मिळेल. – विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त

प्रस्ताव येताच कामाला प्रारंभ

पोलीस आयुक्तालय परिसरात १५ वर्षापूर्वी वृक्षारोपण केले होते. आजही ती सुस्थितीत आहेत. या ठिकाणी ३०३ फूट ध्वजस्तंभ व थीम पार्क उभारण्यासाठी राज्य शासनकडे पाठपुरावा करू. पोलीस आयुक्तालयाकडून यासंदर्भात प्रस्ताव येताच निधी मंजूर करून पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवातदेखील करता येईल. – देवयानी फरांदे, आमदार

First Published on: July 7, 2019 9:15 AM
Exit mobile version